---Advertisement---

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिंगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 6:37 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने नुकताच फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्याचा आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सने भावनिक संदेश दिला आहे. मुंबई इंडियन्स मलिंगासाठी खास व्हिडिओही शेअर केला आहे.

मलिंगाने या महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सला कळवले होते की तो यंदा आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्यानंतर आता बुधवारी(२० जानेवारी) जेव्हा सर्व आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची घोषणा केली, तेव्हा मुंबईच्या मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये मलिंगाचेही नाव होते. पण यानंतर तो निवृत्ती घेत असल्याने त्याचे नाव मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर मुंबई इंडियन्सने मलिंगाचे खास आभार मानले आहेत. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मलिंगाचे काही नवे-जूने फोटो असून त्यात ‘मलिंगा..मलिंगा’ असा जयघोष होतानाचा आवाज येत आहे. याशिवाय त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे की ‘मलिंगा तू आम्हाला १७० वेळा सेलिब्रेशन करण्याची संधी दिली. पण सर्वात आठवणीत राहिल ते सामन्यातील शेवटच्या चेंडूवर घेतलेली विकेट. तू हसला, तू गोलंदाजी केली, तू जिंकलास आणि आम्ही आणखी काय म्हणू शकतो. थँक यू मलिंगा.’

याबरोबर मुंबईने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात मलिंगा गोलंदाजी करण्याच्या ऍक्शनमध्ये दिसत असून त्यावर ४ आयपीएल ट्रॉफी आणि एक चॅम्पियन्स लीग ट्रॉफीचे चित्र आहे. तसेच त्या फोटोत ‘थँक्यू मलिंगा’ असे लिहिले आहे. याबरोबरच यात मलिंगाच्या कामगिरीची आकडेवारी देण्यात आली आहे. तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘आमचा, आपला Malinga!’

मलिंगा हा मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा चौथा खेळाडू आहे. २००९ ते २०१९ या कालावधीत आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने १२२ सामने खेळले होते. दरम्यान त्याने १७० विकेट्स घेतल्या आहेत. यासह मलिंगा हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. याव्यतिरिक्त एका सामन्यात सर्वाधिक वेळा ४ विकेट्स घेण्याचा शानदार विक्रम मलिंगाच्या नावावर आहे. आजवर सर्वाधिक ७ वेळा हा कारनामा त्याने केला आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाशी केली होती चर्चा

मलिंगा म्हणाला की, “मी येत्या आयपीएल हंगामाबाबत मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाशीही चर्चा केली होती. त्यांनी माझ्या निर्णयाबाबत मला पाठिंबा दिला आणि खरोखरच त्यांनी मला खूप समजून घेतले आहे. मला संधी दिल्याबद्दल अंबानी परिवाराचे मनापासून आभार. तसेच मुंबई इंडियन्स संघातील माझे सर्व सहकारी आणि माझ्या सर्व चाहत्यांचे आभार. तुम्हा सर्वांसोबतची १२ वर्षे अतिशय अप्रतिम राहिली.”

तसेच मलिंगा म्हणाला, “निवृत्तीबाबत माझ्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. यानंतर या निर्णयावर पोहचलो आहे. फ्रंचायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. कोरोना परिस्थितीमुळे विमानप्रवासात अनेक बदल झाले आहेत. यामुळे अनेक बंधने आली आहेत. म्हणून फ्रँचायझी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी अवघड झाले आहे. यामुळे मी ऑल फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या अंतिम निर्णयावर पोहचलो आहे”

महत्त्वाच्या बातम्या –

तूम खेल के बारे में क्या जानते हो! भारताला इंग्लंडपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा दिग्गज फॅन्सकडून ट्रोल

“त्याला नक्कीच मोठे सिक्रेट्स माहित असणार”, राजस्थानने उनाटकटला संघात कायम केल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला ‘तो’ गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---