जवळपास ५२ दिवसांच्या कालावधी व ५९ रोमहर्षक सामन्यांच्या मेजवानीनंतर मंगळवारी (१० नोव्हेंबर) रोजी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजल्यापासून खेळवला जाईल. चार वेळचा विजेता मुंबई इंडियन्स आणि आपला पहिला आयपीएल अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स या संघांत ही निर्णायक लढत होईल. एकीकडे दिल्ली आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल; तर, दुसरीकडे मुंबईवर आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा काहीसा दबाव असेल. मुंबईच्या दबावात भर टाकण्याचे काम दिल्लीचे खेळाडू करतील. याच दिल्लीच्या संघातील पाच खेळाडूंविषयी जाणून घेऊया; जे मुंबईला विजयापासून रोखण्यासाठी व दिल्लीला पहिलेवहिले विजेतेपद मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील.
१) शिखर धवन
भारतीय संघाचा नियमित सलामीवीर असलेला शिखर धवन या संपूर्ण हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये राहिला आहे. शिखरने खऱ्या अर्थाने दिल्लीच्या फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली दिसून येते. धवनने संपूर्ण हंगामात सलामीला येत आतापर्यंत १६ सामन्यात ४३.३८ च्या लाजवाब सरासरीने ६०३ धावा चोपल्या आहेत. ज्यात २ शतकांचा व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. धवनला या सामन्यात सर्वाधिक धावा बनवून ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी देखील असेल. ऑरेंज कॅप आणि आयपीएल विजेतेपद असा दुग्धशर्करा योग साधण्यासाठी तो उत्सुक असलेला दिसून येतोय.
२) कागिसो रबाडा
आपल्या गोलंदाजीने संपूर्ण स्पर्धा गाजवलेला दिल्लीचा प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या अंतिम सामन्यात स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास तयार आहे. दिल्लीच्या आतापर्यंतच्या प्रवासात रबाडाचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण राहीलेले दिसून येते. रबाडाने हंगामात दिल्लीसाठी सर्वच्यासर्व १६ सामने खेळताना २९ बळी मिळविले आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला देण्यात येणारी ‘पर्पल कॅप’ त्याच्या डोक्यावर सजली आहे. क्वालिफायर २ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मोक्याच्या वेळी चार बळी मिळवत; त्याने दिल्लीला अंतिम फेरीत देण्याची कामगिरी केली. क्वालिफायर २ सारखेच प्रदर्शन अंतिम सामन्यातही करण्याचा रबाडा प्रयत्न करेल.
३) मार्कस स्टॉयनिस
दिल्लीच्या आयपीएल २०२० मोहिमेत अष्टपैलू खेळाडूंच्या आघाडीवर संघाचे नेतृत्व केलेला खेळाडू म्हणजे मार्कस स्टॉयनिस. अगदी पहिल्या साखळी सामन्यापासून ते क्वालिफायर २ पर्यंत स्टॉयनिसने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य राखले आहे. स्टॉयनिसने आपल्या अष्टपैलू खेळाने आत्तापर्यंत स्पर्धेत ३५२ धावा आणि बहुमूल्य १२ बळी मिळविले आहेत. स्टॉयनिस शिखर धवनपाठोपाठ दिल्लीसाठी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरलाय. क्वालिफायर २ मध्ये संघ व्यवस्थापनाने त्याला सलामीला बढती दिली होती. त्या संधीचे सोने करत त्याने आक्रमक ३८ धावा फटकावल्या. गोलंदाजीतही सनरायझर्स हैदराबादच्या केन विल्यमसन, मनीष पांडे व प्रियम गर्ग या प्रमुख फलंदाजांचे बळी मिळवत; त्याने दिल्लीच्या विजयात हातभार लावला.
४) एन्रीच नॉर्किए
संपूर्ण स्पर्धेत दिल्लीच्या ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा झाली तो खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किए. सातत्याने १५० किमी/प्रतितास वेगाने गोलंदाजी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजस्थान रॉयल्स विरुद्ध एकाच षटकात सर्वच्या सर्व चेंडू १५२ किमी/प्रतितास यापेक्षा जास्त वेगाने टाकून त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याची कामगीरी केली. कागिसो रबाडासह दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळताना; नॉर्किएने १५ सामन्यात २० फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. दिल्ली संघ व्यवस्थापनाला या निर्णायक अंतिम सामन्यात देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
५) रविचंद्रन आश्विन
गेली तीन वर्ष भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर असलेला अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विन या संपूर्ण आयपीएल हंगामात कमालीचा प्रभावी वाटला आहे. किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या पहिल्याच साखळी सामन्यात त्याने, पहिल्या षटकात दोन बळी मिळवत चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना त्याला दुखापत झाली आणि त्याला दोन सामने बाहेर बसावे लागले. पुनरागमनानंतर त्याच्या गोलंदाजीची धार आणखीन वाढली. अश्विनने या हंगामात आतापर्यंत १४ सामने खेळताना ७.७२ च्या किफायतशीर इकॉनॉमी रेटने १३ गडी बाद केले आहेत. मुंबई विरुद्धच झालेल्या क्वालिफायर १ मध्ये रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि कायरन पोलार्ड या मुंबईच्या सर्वात अनुभवी फलंदाजांना माघारी धाडण्याची कामगिरी त्याने फत्ते केली होती. दिल्ली कॅपिटल्सचे पाठीराखे अश्विनकडून या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात अशीच कामगिरी व्हावी; म्हणून प्रार्थना करत असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी ‘या’ सहा गोष्टी क्रिकेट चाहत्यांना जाणून घेणे आवश्यक
एकच नंबर! एकेवेळी दिल्ली गाजवलेला ‘हुकमी एक्का’ फायनलमध्ये दिल्लीला लोळवायला सज्ज
‘आम्हाला हलक्यात घेऊ नका’, दिल्लीच्या प्रशिक्षकाची मुंबईला चेतावणी
ट्रेंडिंग लेख –
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
भावा तु संघात असलास की दिल्लीचे चाहते शेवटपर्यंत निवांत असतात; पाहा कोण आहेत दिल्लीचे संकटमोचक
प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा दिल्लीचा हा पठ्ठ्या म्हणजे दिल्ली कॅपिटल्सची जान आहे जान !!