साल २००७ मध्ये भारताने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि पहिलावहिला टी२० चषक जिंकला. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाने टी२० क्रिकेटला भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात वेगळे स्थान मिळवून दिले. त्यानंतर लगेचच २००८ मध्ये बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेची सुरुवात केली.
याच जगप्रसिद्ध लीगमध्ये मुंबई इंडियन्सला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख मिळवून देण्याचे काम कर्णधार ‘रोहित शर्मा’ याने केले. त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने विक्रमतोड पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. आज (१० एप्रिल) रोहितची मुंबई इंडियन्स परिवारासोबतची १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिनानिमित्त मुंबई इंडियन्सने एक विशेष व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील प्रत्येक खेळाडूला ‘हिटमॅन’संबंधी एखादी गोड आठवण सांगण्यास त्यांनी सांगितले आहे. यावर नवा संघ सहकारी पियुष चावला ते सूर्यकुमार यादव, सौरव तिवारी, इशान किशन अशा बऱ्याच खेळाडूंनी त्याचे कौतुक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर आदित्य तरेने मराठी भाषेत रोहितची आठवण सांगितली आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. रोहितच्या चाहत्यांनीही त्याला मुंबई संघासोबत १० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
The #OneFamily pays tribute to our skipper Ro as he completes 10 years with #MI, today! 💙
Paltan, what's your favourite memory of the Hitman? 💪😎#MumbaiIndians #KhelTakaTak #IPL2021 @ImRo45 pic.twitter.com/xczmAkvLBZ
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2021
३३ वर्षीय रोहितने २००८ साली डेक्कन चाजर्स संघाकडून आयपीएल पदार्पण केले होते. त्यानंतर २०११ साली मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले. तेव्हापासून रोहित मुंबई संघाचा प्रमुख सदस्य बनला आहे. आतापर्यंत त्याने मुंबईकडून १५६ आयपीएल सामने खेळताना ४०७९ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद १०९ धावा इतकी राहिली आहे.
याखेरीज २०१३ साली त्याच्यावर मुंबईच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याने आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे पाच वेळा विजेतेपद जिंकून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जिया जले जान जले! ‘मॅक्स’भाऊची आतषबाजी अन् पंजाब किंग्जची मालकिन ट्रोल, पाहा मीम्स
“पहिला सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे,” पराभवानंतरही रोहितचे मोठे भाष्य