मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या अल्टिमेट खो खो लीग स्पर्धेत मुंबई खिलाडीज संघ पाचव्या क्रमांकावर राहिला. रॅपर बादशाह, पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल बालन यांच्या संयुक्त मालकीच्या मुंबई खिलाडीज संघाने १० सामन्यात ४ विजय, ६पराभव अशी कामगिरी केली.
मात्र या सगळ्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले असून हा संघ पुढच्या मौसमात निश्चितच जोरदार पुनरागमन करेल असा विश्वास संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर श्री यांनी व्यक्त केले.
अल्टिमेट खो खो लीगच्या पहिल्या मौसमाबद्दल बोलताना मुंबई खिलाडीज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर श्री म्हणाले की, आम्ही काहीतरी नवे आणि पूर्णपणे अनोळखी असे करीत होतो. त्यामुळे ते खूपच आव्हानात्मक होते. खेळाडूंच्या निवडीतही आम्हाला सहाव्या क्रमांकावर संधी मिळाली.तरीही सर्वोत्तम खेळाडू निवडण्याचा आम्ही प्रयत्न केला. मौसमाआधीच्या शिबिरातून अगदी थोड्या काळात संघ निवडण्याचे आवाहन आम्ही पेलले पण हा सगळा अनुभव खूपच अदभुत होता. आमचे दोन महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाजूला झाल्यामुळे आव्हान आणखी कडवे बनले, तरीही आम्ही चांगली कामगिरी केली.
या पहिल्या मौसमातून स्पर्धेचा फॉरमॅट, नवे नियम अशा अनेक नव्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या असे सांगून ते पुढे म्हणाले की, खेळाडूना मॅटवर, प्रशिक्षकांसमोर आणि नव्या नियमांनी तसेच प्रचंड गर्दीसमोर आणि कॅमेऱ्यासमोर खेळण्याची सवय नव्हती. एक व्यवस्थापनाचा भाग असल्यामुळे एक समतोल संघ असण्याचे तसेच दर्जेदार राखीव खेळाडू असण्याचे महत्व यामधून आम्हाला समजले. पण एकंदरीतच आमच्यासाठी हा एक चांगला अनुभव होता.
आगामी भविष्यातील संघाच्या नियोजनाबद्दल मधुकर श्री म्हणाले की, महाराष्ट्र हे खो खो चे महत्वाचे केंद्र असून मुंबई खिलाडीज या विभागातून राज्याचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव संघ आहे. खो खोचा विकास हे आमचे एकमेव लक्ष्य आहे. त्यामुळे पायाभूत विकास कार्यक्रम राबवून मुंबई आणि परिसरातून गुणवान खेळाडूंचा शोध घेणे यामुळे आम्हाला शक्य होईल. महराष्ट्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांशी आम्ही करार करणार असून त्यांना सुविधा पुरवण्यास मदत देखील करणार आहे. त्यातून अल्टिमेट खो खो लीग बद्दल जागरूकता वाढेल आणि खो खो प्रेमींनी एक जमातच तयार होईल.
पुढच्या वर्षी अल्टिमेट खो खो लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगून मधुकर श्री म्हणाले की, आम्ही या मौसमातील कामगिरीचे विश्लेषण करीत असून आमच्या चुका निश्चितच सुधारण्यावर काम करत आहे.या मौसमातून अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या असून आमच्याकडे अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यांनी चांगली कामगिरीही बजावली आहे. त्यांना आगामी काळात ऑफ सिजनमध्येही मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढच्या मौसमात मुंबई खिलाडीज संघ जोरदार पुनरागमन करू शकेल.
अल्टिमेट खो खो लीगच्या भविष्याबद्दल बोलताना मधुकर पुढे म्हणाले की, पहिलाच मौसम असल्यामुळे व्यावसायिक, भागीदार आणि प्रायोजक मिळवण्यास आम्हाला त्रास झाला. पण हळूहळू सर्व ठीक होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. तसेच, या स्पर्धेला प्रेक्षकांचाही प्रतिसाद जोरदार होता. त्यामुळे लीगचे भवितव्य उज्वल असून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास देशातील खो खो या खेळाचा विकास आणि प्रसार वेगाने होईल असा आम्हांला खात्री आहे.