मुंबई उपनगर कबड्डी असो; महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने व मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने “मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करीत आहे. कुर्ला (पूर्व), नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दि.१९ते २२ मार्च २०१८ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत १६ पुरुष व १६ महिला संघांना सहभाग देण्यात येणार आहे.
या स्पर्धेकरिता ४मातीची क्रीडांगणे तयार करण्यात येत असून क्रीडा रसिकांना खेळाचा नीट आनंद घेता यावा म्हणून पाच हजार क्षमतेची प्रेक्षक आसन व्यवस्था उभारण्यात आली आहे.सर्व सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युतझोतात खेळविण्यात येतील.
भारत पेट्रोलियम, एअर इंडिया,महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, मध्य रेल्वे, सेन्ट्रल बँक, देना बँक, आयकर – पुणे, मुंबई बंदर, किंग्स बिल्डर, मुंबई महानगर पालिका आदी पुरुष तर, महात्मा गांधी, संघर्ष, महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, सुवर्णयुग, शिव ओम्, अनिकेत-रत्नागिरी,चिपळूण स्पोर्ट्स, शिवशक्ती, अमरहिंद, मुंबई पोलीस, जय हनुमान कोल्हापूर, विश्वशांती पालघर, कर्नाळा स्पोर्ट्स आदी महिला गटात या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या सहभागी पुरुष व महिला संघाची चार-चार गटात विभागणी करण्यात येणार असून सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.
साडेचार लाखापेक्षा अधिक रोख रखमेच्या बक्षिसांची खैरात
स्पर्धेत अंतिम विजयी होणाऱ्या दोन्ही गटातील संघांना रोख रु. एक लाख (₹ १,००,०००/-) व महापौर चषक प्रदान करण्यात येईल. सर्व पारितोषिके दोन्ही गटाकरिता समान आहेत. अंतिम उपविजयी रोख रु. पन्नास हजार (₹५०,०००/-) व चषक. उपांत्य उपविजयी संघांना प्रत्येकी रोख रु. पंचवीस हजार (₹ २५,०००/-) व चषक. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू रोख रु. पंधरा हजार (₹१५,०००/-). स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचा खेळाडू प्रत्येकी रोख रु. दहा हजार (₹१०,०००/-). दिवसाचा मानकरी रोख रु.दोन हजार पाचशे (₹२,५००/-). अशी भरघोष पारितोषिकांची रक्कम खेळाडूंकरिता वाटप करण्यात येणार आहे.
त्यामुळे स्पर्धेत चुरस पहावयास मिळेल. या स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे.खेळाडूंची निवास व्यवस्था आर सी एफ च्या क्रीडा वसतिगृहात केली गेली आहे. स्पर्धा उच्च दर्जाची व्हावी आणि खेळाडूंच्या व्यवस्थेत कोणती कमी राहू नये म्हणून मुं. उपनगरचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.