सध्या मुंबई आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ यांच्यात इराणी चषक खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. मात्र असं असलं तरी मुंबईची सामन्यावर पकड मजबूत आहे.
गुरुवारी (3 ऑक्टोबर) मुंबईचा पहिला डाव 537 धावांवर आटोपला. याच्या प्रत्युत्तरात ‘रेस्ट ऑफ इंडिया’नं 74 षटकांत 4 गडी गमावून 289 धावा केल्या. संघ अजूनही 248 धावांनी मागे आहे. मुंबईसाठी सरफराज खाननं मॅरेथॉन खेळी खेळली. तो द्विशतक झळकावल्यानंतर नाबाद राहिला. तर ‘रेस्ट ऑफ इंडिया’साठी अभिमन्यू ईश्वरननं धावांचा पाऊस पाडला. तो शतक झळकावून क्रिजवर नाबाद आहे.
दुसऱ्या दिवसाच्या 536/9 या धावसंख्येहून पुढे खेळताना मुंबईचा पहिला डाव फार काळ टिकला नाही. शेवटची विकेटही अवघ्या एका धावेनंतर पडली. मोहम्मद जुनैद खान खातं न उघडता बाद झाला. सरफराज खान एका टोकाला नाबाद राहिला. त्यानं 286 चेंडूंत 25 चौकार आणि चार षटकारांसह 222 धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियाकडून मुकेश कुमारनं पाच बळी घेतले. तर यश दयाल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना रेस्ट ऑफ इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संघाची पहिली विकेट 40 धावांवर कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपानं पडली. ऋतुराजनं 27 चेंडूत 9 धावा केल्या. साई सुदर्शननं काही चांगले शॉट्स खेळले, पण तोही 32 धावा करून बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 16 धावांचं योगदान दिलं, तर इशान किशननं 38 धावांची खेळी केली.
या सामन्यात अभिमन्यू ईश्वरनची एक वेगळीच शैली पाहायला मिळाली. त्याने दुलीप ट्रॉफीमधील आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 26वं शतक झळकावलं. खेळ संपला तेव्हा तो 212 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 151 धावांवर खेळत होता. ध्रुव जुरेल 30 धावा करून त्याच्यासोबत उभा आहे. मुंबईकडून मोहित अवस्थीनं सर्वाधिक दोन बळी घेतले.
हेही वाचा –
“हे पूर्णपणे खोटं आहे”, हरभजन सिंगच्या धोनीवरील वक्तव्यावर सीएसकेच्या स्टाफचं उत्तर
“विराट कोहलीचा हा शेवटचा इंग्लंड दौरा असेल”, महान गोलंदाजाची धक्कादायक भविष्यवाणी
या खेळाडूनं ठोकलं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26वं शतक, अजून टीम इंडियात संधी मिळालेली नाही!