पर्थ | पर्थ कसोटीत अपेक्षेप्रमाणेचे भारतीय सलामीवीर पहिल्या डावात अपेक्षित धावांवरच बाद झाले. केएल राहुलने १७ चेंडूत २ तर मुरली विजयने १२ चेंडूत ० धावा केल्या.
हे दोन्ही खेळाडू या डावात त्रिफळाचीत झाले तर आधीचे काही सामने बाहेर जाणाऱ्या चेंडूचा पाठलाग करताना बाद होत आहेत.
दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला जेव्हा गरज असते तेव्हाच हे सलामीवीर खेळताना दिसत नाही. यामुळे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारावर मोठा दबाव येत आहे. असे असले तरी हे दोन खेळाडू गेली काही वर्ष सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. कधीकधी तर पुजारा आणि विराट सलामीलाच खेळत आहेत की काय अशी धावसंख्या फलकावर असताना ते फलंदाजीला आलेले असतात.
दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेट खेळणारे अनेक चांगले खेळाडू राष्ट्रीय संघाची दारे ठोठावत असताना संघव्यवस्थापन आणि निवड समितीला विजय आणि राहुल या दोन खेळाडूंना संधी देताना काय पात्रता वापरतात देव जाणे.
शिखर धवनला कसोटी संघाबाहेरचा रस्ता दाखवताना जो नियम वापरला जातो तो नक्कीच राहुल किंवा विजयबद्दल वापरला जातो की नाही हा प्रश्न उपस्थित व्हावा अशी वेळ आता आली आहे.
काय आहे यांची २०१८ कसोटीतील कामगिरी-
केएल राहुलने यावर्षी भारताकडून एकूण १२ कसोटी सामने खेळले असून त्यात २१ डावात फलंदाजी करताना त्याने २३.४०च्या सरासरीने जेमतेम ४६८ धावा केल्या आहेत.
तर दुसऱ्या बाजूला विजयने ८ सामन्यात १४ डावात फलंदाजी करताना १८.७१च्या सरासरीने २६२ धावा केल्या आहेत.
टीम इंडिया यावर्षी एकूण १३ सामने खेळली असून यातील तब्बल १२ सामन्यात केएल राहुलला संधी मिळाली आहे. यावर्षी भारताकडून केवळ विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि केएल राहुल हेच खेळाडू १२ सामने खेळले आहेत. त्यात विराटने केएल राहुलच्या अंदाजे तीनपट अर्थात ११६४ तर पुजाराने अंदाजे दुप्पट अर्थात ७२७ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला विजयला इंग्लंड दौऱ्यातून राहिलेल्या तीन सामन्यांसाठी निवड न झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले होते. या निर्णयावर चाहत्यांसह अनेकांनी टीका केली होती. याच मुरली विजयकडून आॅस्ट्रेलिया दौऱ्यात मोठी अपेक्षा होती. यापुर्वी याच आॅस्ट्रेलिया भूमीत विजयने ६० पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा केल्या होत्या. परंतु या मालिकेत ती सरासरी राखणं सोडा ३ डावात ६० धावा सुद्धा विजयला करता आल्या नाहीत.
परदेशात आनंदीआनंद-
या दोन सलामीवीरांनी यावर्षी परदेशातही प्रत्येक मालिकेत आपली ही शेवटची मालिका आहे की काय अशाच खेळी केल्या आहेत. यावर्षी १३ पैकी तब्बल १० सामने आजपर्यंत परदेशात खेळली आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेतील ३ कसोटी सामने, इंग्लंडमधील ५ कसोटी तर आस्ट्रेलियातील २ सामन्यांचा समावेश आहे.
या १०पैकी ९ कसोटी सामन्यात केएल राहुलला संधी मिळाली. त्याने यात १७ डावांत फलंदाजी करताना २२.१७च्या सरासरीने ३७७ धावा केल्या. त्याला केवळ दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर परदेशात झालेल्या कोणत्याही सामन्यात त्याला संघाच्या बाहेर ठेवण्यात आले नव्हते.
त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही मोठे अपयश येऊनही त्याला आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात कायम ठेवण्यात आले.
दुसऱ्या बाजूला २०१८मध्ये मुरली विजयला परदेशात १० पैकी ७ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने १३ डावात १२.०७च्या सरासरीने १५७ धावा केल्या. विजयपेक्षा जास्त धावा हार्दिक पंड्या, आर अश्विन यांनी परदेशात केल्या तर विजयपेक्षा चांगली सरासरी याच काळात रोहित शर्मा, हनुमा विहारी, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा आणि पार्थिव पटेल यांनी राखली होती.
असे असतानाही संघव्यवस्थापन या खेळाडूंना सातत्याने का संधी देत आहे? हाच प्रश्न उभा रहातो. पुढील सामन्यात पृथ्वी शाॅ फीट ठरल्यावर नक्कीच एका खेळाडूला बाहेर जावे लागेल. परंतु याच सामन्यात एक चांगला पर्याय म्हणून संघव्यवस्थापन पृथ्वी शाॅबरोबर रोहित शर्मा किंवा पार्थिव पटेलचा विचार करेल का? दुसऱ्या बाजूला परदेशात चांगली कामगिरी करत असलेला विहारीही सलामीला फलंदाजीसाठी तयार असल्याचे सांगत आहे. जर विजय- राहुल एकाही सामन्यात चांगली कामगिरी करणार नसेल तर रोहित शर्मा, पार्थिव पटेल किंवा हनुमा विहारीला तिसऱ्या कसोटीत पृथ्वी शाॅबरोबर संधी मिळण्यात काहीच वावगे नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का
–Video: सुपरमॅन कोहलीचा हा अफलातून झेल पाहिला का?