आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार म्हणून शेवटचा टी२० विश्वचषक खेळत असलेल्या कोहलीला विजय मिळवता आला नाही. कोहलीनंतर आता रोहित शर्माला टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. कोहलीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंनी याबाबत आपले मत मांडले आहे. अशातच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी याबाबत मोठे वक्तव्य केले.
गेल्या काही वर्षांपासून विराट कोहलीने कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केल्यामुळे अनेकांना आश्चर्य झाले होते. अशातच पाकिस्तान संघाचे माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद यांनी म्हटले की, “जेव्हा एक यशस्वी कर्णधार आपले पद सोडण्याचा विचार करतो. त्यावेळी एकच गोष्ट असू शकते, ती म्हणजे ड्रेसिंग रूमचे वातावरण ठीक नाहिये. मला तर वाटतं ड्रेसिंग रूममध्ये मुंबई आणि दिल्ली असे दोन गट आहेत.”
विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नामिबिया संघाविरुद्ध कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळला. अहमद यांचे म्हणणे आहे की, विराट कोहली लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल. त्यांनी म्हटले की, “मला असे वाटते की,तो लवकरच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल. परंतु तो आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येईल. मला तर हेच वाटते की, विराटला या स्वरूपात जितकं क्रिकेट खेळायचं होतं, तितकं त्याचं खेळून झालं आहे.”
तसेच भारतीय संघाला आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. याबाबत बोलताना अहमद म्हणाले की, “मला तर वाटते की, भारतीय संघ आयपीएल स्पर्धेमुळे टी२० विश्वचषक स्पर्धेत फ्लॉप ठरला. विश्वचषक स्पर्धेपूर्वी इतके दिवस बायो-बबल मध्ये राहिल्यामुळे त्यांचे खेळाडू थकलेले दिसून येत होते.”