यूएई आणि ओमान मध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु भारतीय खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने पराभूत केले. यासह भारतीय संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नव्हता. त्यानंतर विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी बायो-बबल मध्ये राहून खेळाडूंना थकवा येतोय हे कारण दिले होते. आता येणाऱ्या काळात बीसीसीआय एक मोठे पाऊल उचलणार आहे. ज्यामुळे खेळाडूंना बायो बबलचा थकवा जाणवणार नाही.
माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआय आता संघ निवडण्यापूर्वी खेळाडूची चाचणी घेईल आणि त्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करेल. या प्रक्रियेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील सहभागी असणार आहेत. राहुल द्रविड यांनी देखील खेळाडूंच्या थकव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत निवडकर्ते खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत निर्णय घेत असत. परंतु टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर खेळाडूंचा थकवा हे महत्वाचे कारण ठरले आहे. अशा परिस्थितीत, सूत्रांच्या मते, बीसीसीआयला बायो-बबलचा खेळाडूंवर परिणाम होऊ नये असे वाटत आहे.
टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती देत म्हटले की, “बीसीसीआय निर्णय घेईल की, कुठल्या खेळाडूला विश्रांती द्यायची आहे. कुठला खेळाडू किती क्रिकेट खेळला आहे यावरून त्याचा निर्णय घेतला जाईल. ज्या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी आलेला खेळाडू चांगली कामगिरी करतो, तरीही त्या खेळाडूचे स्थान धोक्यात येणार नाही. त्याला त्याची जागा परत मिळेल.”
तसेच विराट कोहली,रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना प्रत्येक नेहमी विश्रांती मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहे. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडला रवाना झाला होता. सप्टेंबर पर्यंत हा संघ इंग्लंडमध्ये होता. त्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा आणि टी२० विश्वचषक स्पर्धेत देखील खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागले आहे.






