बांगलादेशने टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आपला संघ जाहीर केला आहे. 15 सदस्यीय संघाची धुरा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास याच्याकडे सोपवण्यात आली आहे, जो एक हिंदू क्रिकेटपटू आहे. आयपीएल 2026 मधून बीसीसीआयच्या निर्देशानुसार मुस्तफिजुर रहमानला बाहेर काढल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना विश्वचषकासाठी भारतात पाठवू इच्छित नाही. बांगलादेश बोर्डाने आयसीसीकडे आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप आयसीसीकडून यावर कोणतेही उत्तर आलेले नाही.
दुसरीकडे, बांगलादेशने टी20 वर्ल्ड कपमध्ये हिंदू कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. लिटन दास हा बांगलादेशचा हिंदू क्रिकेटपटू असून त्याचा जन्म 13 ऑक्टोबर 1994 रोजी दिनाजपूर येथे झाला. त्याचे कुटुंब पारंपारिक बंगाली हिंदू कायस्थ आहे. लिटन दासला सोशल मीडियावर सार्वजनिकरित्या हिंदू सण साजरे करताना वारंवार पाहिले जाते. लिटन उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे. त्याने जून 2015 मध्ये बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये बांगलादेशसाठी सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम आहे. दासला त्याच्या स्टायलिश आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते.
लिटन दासच्या नावावर वनडेमध्ये बांगलादेशतर्फे सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. लिटनने 2020 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 176 धावांची खेळी केली होती. बांगलादेशच्या या महत्त्वाच्या फलंदाजाने आतापर्यंत 52 कसोटी सामने खेळले असून त्यात 3117 धावा केल्या आहेत. कसोटीत लिटन दासच्या नावावर 5 शतके आणि 19 अर्धशतके आहेत. याशिवाय, वनडेमध्ये लिटनने 95 सामने खेळून 2569 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लिटन दासने आतापर्यंत 120 सामन्यांत एकूण 2655 धावा करण्यात यश मिळवले आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 16 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच एकूण टी20 कारकिर्दीत लिटन दासने 260 सामन्यांत 5984 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये बांगलादेशच्या या हिंदू क्रिकेटपटूचा स्ट्राईक रेट 88.36 राहिला आहे, तर त्याने एक शतकही ठोकले आहे.
बांगलादेशच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये लिटन दासचे नाव येते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून वार्षिक करारापोटी तो 50000डॉलर (सुमारे 45 लाख रुपये) कमावतो. लिटन दासला आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 50 लाख रुपयांना खरेदी केले होते. याशिवाय, बीपीएल 2024 आणि 2025 मधून त्याला अनुक्रमे 45 लाख आणि 72 लाख रुपयांची कमाई झाली होती. अहवालानुसार, लिटन दासची एकूण संपत्ती 3 दशलक्ष डॉलर म्हणजेच 27 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार लिटन दासकडे आलिशान घर आणि अनेक लक्झरी गाड्याही आहेत.






