बांग्लादेशचा अष्टपैलू मुस्तफिजूर रहमानने नुकतेच्या त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये तो एक विजेता चषक घेऊन उभा आहे. हा चषक ओडोमो बांग्लादेश टी२० कपचा आहे. यामध्ये मुस्तफिजूर धूमकेतू ईलेवन संघाकडून खेळला आणि संघाला विजेतेपद जिंकून दिले. (Mustafizur Rahman)
मीरपूरच्या शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या त्या रोमांचक अंतिम सामन्यात धूमकेतू ईलेवनने दरबार ईलेवनचा पराभव केला. हा सामना धूमकेतूने २०८ धावसंख्येचा बचाव करताना ७ धावांनी जिंकला. यामध्ये तंजिद हसनने सामनाविजयी खेळी केली. त्याने ५४ चेंडूत नाबाद ८८ धावा केल्याने तो सामनावीर ठरला.
या सामन्यात दरबारने नाणेफेक जिंकत धूमकेतूला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. सैफ हसनने तंजिदसोबत १३.१ षटकात १४९ धावांची भागीदारी केली. सैफ ४४ चेंडूत ७९ धावा करत बाद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना दरबारने पहिली विकेट लगेच गमावली. मेहदी हसन शून्यावर बाद झाला. नंतर हबीबूर रहमान सोहनने नुरुल हसनच्या साथीने डाव सांभाळला.
हबीबूरने २७ चेंडूत ६७ धावा केल्या. त्यामुळे धूमकेतू सामना गमावणार की काय असे वाटत असताना त्याचा अडसर मुस्तफिजुरने दूर केला. दरबारचे प्रयत्न सुरूच राहिले. नुरुलने ५४ धावा केल्या, तर अफिफ होसौन ६० धावांवर नाबाद राहिला.
मुस्तफिजुरने चांगली कामगिरी करत दरबारला रोकण्यात यश मिळवले. त्याने ४ षटकात ३३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकात त्याने केवळ ८ धावा दिल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
मुस्तफिजूरला आगामी आयपीएलच्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने करारातून मुक्त केले. त्यानंतर बांग्लादेश आणि भारत यांच्यातील क्रिकेटच्या नात्यात दुरावा आला. आधीच दोन्ही देशाचे राजकिय संबंध ठीक नाहीत. त्यामुळे बांग्लादेशने सुरू असलेल्या टी२० विश्वचषकातून माघार घेतली. त्यांच्याजागी या स्पर्धेत स्कॉटलंड खेळत आहे.






