मुंबई । बॉलिवूडचा स्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईमधील बांद्रा येथील आपल्या घरी आत्महत्या करून जीवन संपवले. त्याने मानसिक तणावामध्ये हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडले. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
सुशांतच्या आत्महत्येनंतर मानसिक ताण तणावाचा मुद्दा जास्त चर्चिला जात आहे. भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू देखील या मानसिक तणावात गेले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा गेल्या काही दिवसांपूर्वी मानसिक ताणतणावात आला होता. अशा कठीण प्रसंगी भारतीय संघातील खेळाडू आणि कुटुंबातील व्यक्तीनी आधार दिल्याने तो यातून बाहेर पडला.
तो म्हणाला, “मानसिक ताण तणाव आला असेल तर मानोपसचार तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. त्यांच्या सल्ल्याने आपण तणावातून बाहेर पडू शकतो. तसेच अशा प्रसंगी अध्यात्माला जवळ केले पाहिजे. भारतीय संघातील माझे सहकारी मित्र आणि विराट कोहली यांनी या कठीण प्रसंगी माझी खूप मदत केलेली आहे. माझ्या सहकारी मित्रांनी मैदानावर राग आणि निराशा बाहेर काढण्यास सांगितले.”
शमी म्हणतो, “ताणतणाव ही मोठी समस्या आहे. ज्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सुशांत सिंग राजपूत सारख्या अभिनेत्याने असे टोकाचे पाऊल उचलणे खूपच वाईट आहे. तो माझा मित्र होता. घटनेपूर्वी मी त्यांच्याशी बोललो असतो तर त्याची मानसिक स्थिती जाणून घेता आली असती.”
ताणतणावातून बाहेर पडल्यावर मोहम्मद शमीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल 16 गडी बाद केले होते. मोहम्मद शमीने भारताकडून 49 कसोटी आणि 77 वनडे सामने खेळला आहे. कसोटीत 27.36 च्या सरासरीने 180 बळी टिपले तर 77 वनडेत 25.42 च्या सरासरीने 144 बळी घेतले आहेत.