पुणे। यंदाच्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे आकर्षण असणारा रशियाचा अस्लन कारात्सेव याने जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये येण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. आपल्या उद्दिष्टाकडे भक्कम पाऊल टाकण्यासाठी आपण या स्पर्धेला पहिली पायरी मानत आहोत, असेही तो म्हणाला.
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला आज म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील कोर्टवर सुरवात झाली. यंदाच्या मोसमाला सुरवात झाली, तेव्हा मी समोर काही उद्दिष्टे ठेवली आहेत. यात प्रथम पहिल्या पंधरात आणि नंतर पहिल्या दहांत स्थान मिळविण्याचे माझे उद्दिष्ट आहे. मला माझा खेळ उंचवायचा आहे. मोसमाला सुरवात होण्यापूर्वी मी त्या गोष्टींवर काम करत होतो, असेही त्याने या वेळी बोलताना सांगितले.
रशियाच्या या २८ वर्षीय गुणी टेनिसपटूंने मोसमास यशस्वी सुरवात केली आहे. त्याने सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकताना कारकिर्दीतले एकेरीतील तिसरे एटीपी विजेतेपद मिळविले होते. त्या वेळी त्याने अंतिम फेरीत दोन वेळच्या ऑलिंपिक विजेत्या अॅंडी मरे याचा पराभव केला होता. आता एटीपी मालिकेतील आणखी एक विजेतेपद मिळविण्यासाठी तो उत्सुक आहे. यासाठी तो पुणे येथील स्पर्धेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या कारास्तेव याला महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजित चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अग्रमनांकन देण्यात आले आहे. कारास्तेव पुण्यात दुसऱ्यांदा खेळत असून त्याच्या आव्हानाला दुसऱ्या फेरीपासून प्रारंभ होणार आहे. गतमालिकेत पर्यायी खेळाडू म्हणून आलेल्या कारास्तेवला पात्रता फेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
कारास्तेव म्हणाला की, पुण्यात या स्पर्धेत सहभागी येऊन मला फार आनंद झाला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धा खेळल्यानंतर तेथील वातावरण आणि या ठिकाणचे वातावरण मिळतेजुळते आहे. स्पर्धेत अव्वल मानांकन असल्यामुळे याचा फायदा तुम्हाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळतेच, पण प्रत्यक्ष सामना खेळला तर त्याच्या सरावाचा व लय मिळण्यासाठीचा फायदा तुम्हाला मिळतो.
साल 2021 मध्ये कारास्तेव याने आपल्या पदार्पणातच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. तसेच त्याने मिश्र दुहेरीत एलेना वेसनीनाच्या साथीत ऑलिंपिक स्पर्धेत रजत पदक पटकावले होते. याशिवाय त्याने आपल्या चमकदार कामगिरीने अव्वल जागतिक मानांकन असलेल्या नोव्हाक जोकोविचवर सनसनाटी विजय मिळवत सर्बिया ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्री धडाकेबाज सुरुवात