मेलबर्न । ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ या मोसमाच्या पहिल्या ग्रँडस्लम स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालला अव्वल मानांकन तर स्वित्झरलँडच्या रॉजर फेडररला द्वितीय मानांकन मिळाले आहे.
आज या स्पर्धेचा मुख्य ड्रा घोषित करण्यात आला. रॉजर फेडरर यावर्षीचे अभियान अलिजाझ बेडेनेबरोबर पहिल्या फेरीतील सामन्याने करेल. फेडरर या स्पर्धेचा ५वेळचा विजेता असून तो आपले २०१७ विजेतेपद राखण्यासाठीच मैदानात उतरले. त्याच्याकडे या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे.
एटीपी क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या आणि गेला काही काळ टेनिसपासून दूर असलेल्या नोवाक जोकोविचचा पहिल्या फेरीचा सामना डोनाल्ड यंग या खेळाडूबरोबर होईल. तर दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर जाईल मॉनफिल्सचे आव्हान असेल.
महाराष्ट्र ओपन स्पर्धेत अव्वल मानांकन असलेल्या मारिन चिलीचला या स्पर्धेत ६वे मानांकन मिळाले असून त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अव्वल मानांकित राफेल नदालशी होण्याची शक्यता आहे.
स्पर्धेत तृतीय मानांकन हे ग्रिगोर दिमित्रोव्हला देण्यात आले असून त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना २५ वर्षीय जॅक शॉकशी होऊ शकतो.
महाराष्ट्र ओपन विजेता जाईल्स सिमोन या स्पर्धेत अव्वल मानांकित नदालच्या गटात असून उपउपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ मारिन चिलीचशी होऊ शकते. असे झाले तर ती महाराष्ट्र ओपनच्या उपांत्यफेरीची पुनरावृत्ती ठरेल.
२० वर्षीय अलेक्सान्डर झवेरवला स्पर्धेत चौथे मानांकन असून त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ५व्या मानांकित डॉमिनिक थिएमशी होऊ शकतो. झवेरवकडे टेनिस विश्वाचे विशेष लक्ष असणार आहे. याच गटात नोवाक जोकोविच असणार आहे.
डेविड गॉफिनला स्पर्धेत ७वे मानांकन असून त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा संभाव्य सामना गतविजेत्या फेडररशी होऊ शकतो.