मुंबई । जपानच्या नाओमी ओसाकाने पहिला सेट गमावल्यानंतर बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला पराभूत करुन अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ओसाकाचे हे तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
यापूर्वी तिने 2018 मध्ये अमेरिकन ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. रिकाम्या स्टेडियममध्ये एक तास 53 मिनिटे चाललेल्या या सामन्यात, चौथ्या मानांकित ओसाकाने अझारेन्काचा 1-6, 6-3, 6-3 असा पराभव केला.
ओसाकाने पहिला सेट गमावला
31 वर्षीय अझारेन्काने 26 मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये सहज विजय मिळविला होता. मात्र, यानंतर ओसाकाने पुनरागमन करत सामना जिंकला.
25 वर्षांनंतर यूएस ओपनमध्ये प्रथमच अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर एका महिला खेळाडूने विजेतेपद जिंकले. यापूर्वी 1994 मध्ये अरांत्जा सांचेझ विकारियोने स्टेफी ग्राफचा पराभव करत या चषकावर नाव कोरले होते.
ओसका जेतेपद जिंकल्यानंतर म्हणाली की, “मला वाटले की एका तासाच्या आत सामना गमावणे मला लाजिरवाणे वाटेल. जिंकण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करण्याचा विचार मी करत होते आणि आपली वृत्ती सुधारित करावी लागेल.”
“मी केवळ जिंकण्याचा विचार करत नव्हते. मी फक्त स्पर्धा करण्याचा विचार करत होते. असो, मी ट्रॉफी जिंकण्यात मी यशस्वी ठरले,” असेही ओसाकाने सांगितले.
22 वर्षीय ओसाकाचा जन्म जपानमध्ये झाला होता, पण वयाच्या तिसर्या वर्षी ती अमेरिकेत आली. आता कॅलिफोर्नियामध्ये राहणारी ओसाका चषक जिंकण्याव्यतिरिक्त वांशिक भेदभावाविरूद्ध आवाज बनण्याच्या उद्देशाने यूएस ओपनमध्ये सहभागी झाली होती.