नाशिक: डेक्कन क्लिफहँगर पुणे ते गोवा या 646 किमीच्या सायकलिंग स्पर्धेत नाशिककर सायकलपटू उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या बाळासाहेब वाकचौरे (28 तास 26 मिनिटे) आणि लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू (26 तास 6 मिनिटे) यांनी पूर्ण करताना अमेरिकेतील रॅम (RAAM) या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठीची ही पात्रता फेरी पूर्ण केली आहे.
सोबतच दर्शन दुबे यांनीही स्पर्धा पूर्ण केली मात्र त्यांना रॅम साठी पात्रता मिळवता आली नाही. सोबतच अनिकेत झंवर यांनी स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना काही कारणाने 400 किमी पूर्ण केल्यानंतर स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
ले. कर्नल भरत पन्नू यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धा पूर्ण करताना रॅम पात्रता मिळवली असून पुढीलवर्षी 2019 मध्ये होणाऱ्या रॅम स्पर्धेत ते वैयक्तिक गटातून सहभाग घेणार आहेत. त्यामुळे आर्मीतील त्यांचे सहकारी ले. श्रीनिवास गोकुलनाथ यांच्यानंतर रॅम स्पर्धा एकट्याने पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांना प्रमोद तुपे यांची क्रु मेम्बर म्हणून साथ लाभली.
विशेष म्हणजे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या बाळासाहेब वाकचौरे यांनी केवळ वर्षभरापूर्वी नाशिक सायकलिस्टचे सदस्यत्व स्वीकारून सहकाऱ्यांसोबत सायकलिंग करण्यास सुरुवात केली असून त्याबळावर त्यांनी डेक्कन क्लिफहँगर स्पर्धा थेट रॅमची पात्रता मिळवण्याच्या वेळेत पूर्ण करण्याची किमया साधली आहे. त्यांना ऍड. दत्तात्रेय चकोर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी त्यांना उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, मास्टर चैतन्य वाकचौरे, रामेश्वर चांदोरे, सागर वाघमारे, कैलास कणखरे, गौरव चकोर, ओंकार जंगम या क्रू सदस्यांची साथ मिळाली.
त्याचप्रमाणे संगमनेरच्या विजय काळे, निलेश वाकचौरे, अमोल कानवडे आणि शरद काळे-पाटील या चौकडीने ४० वर्षावरील पुरुष गटात पहिल्या क्रमांकावर राहात २२ तास ४५ मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. तसेच विजय ताजने, डॉ. संजय विखे, प्रमोद देशमुख आणि विनायक पानसरे यांनी याच गटात २३ तास १५मिनी मिनिटात रेस पूर्ण करताना तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.
या सर्वांच्या कामगिरीने नाशिक आणि संगमनेरचे नाव देशभरात पोहचण्यास मदत झाली असून नाशिकची सायकल चळवळ आता मोठे रूप धारण करताना दिसत आहे.