भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागील काही काळापासून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नेथन लायन याचा गिऱ्हाईक ठरतोय. गिऱ्हाईक यासाठी कारण, आतापर्यंत रोहित शर्मा याने कसोटीत जेवढ्या गोलंदाजांचा सामना केलाय, त्यात लायनने सर्वाधिक वेळा रोहितला तंबूचा रस्ता दाखवलाय. अशात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही लायननेच रोहितची शिकार केली आणि खास विक्रम रचला.
रोहितने लायनच्या फिरकीसमोर टेकले गुडघे
झाले असे की, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 बाद 170 धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. यासह भारताला 444 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Rohit Sharma And Shubman Gill) सलामीला उतरले. यावेळी शुबमन गिल आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यांच्यात 41 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर रोहितने एका बाजूने डाव सांभाळत फटकेबाजी सुरू ठेवली, पण शेवटी त्यालाही 20व्या षटकात विकेट गमवावी लागली.
ऑस्ट्रेलियाकडून 20वे षटक नेथन लायन (Nathan Lyon) टाकत होता. लायनने दुसरा चेंडू टाकताच, त्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने बसून स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो पायचीत बाद झाला. रोहितची विकेट काढताच लायनने खास विक्रम रचला. लायन, रोहितला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज बनला. त्याने रोहितला कसोटीत सर्वाधिक 9 वेळा तंबूचा रस्ता दाखवला. रोहित यावेळी 60 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 43 धावा करून बाद झाला.
लायननंतर रोहितला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा याच्या नावावर आहे. रबाडाने 5 वेळा रोहितला बाद केले आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या पॅट कमिन्स आणि जॅक लीच आहेत. या दोघांनीही प्रत्येकी 4 वेळा कसोटीत रोहितला बाद केले आहे.
कसोटीत रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
9 – नेथन लायन*
5 – कागिसो रबाडा
4 – पॅट कमिन्स
4 – जॅक लीच
महत्वाच्या बातम्या-
कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोपणाऱ्या 5 भारतीयांच्या यादीत विराटचाही समावेश, पण ‘किंग’चा नंबर कितवा?
शुबमनसोबत ‘ते’ गलिच्छ कृत्य करताना विराट कॅमेऱ्यात कैद, पाहून नेटकरीही म्हणाले, ‘लाज वाटते तुझी’