एक गोलंदाज ज्याचा अश्या धरतीवर जन्म झाला होता, जिथे स्पिन चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांना जास्त महत्त्व दिले जात नव्हते. पण, आज त्या गोलंदाजाने त्याच्या फिरकी गोलंदाजीने केवळ स्वत:ला नव्हे तर त्याच्या संघालाही एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. या गोलंदाजाला मॉडर्न कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
तसे तर, भारतीय संघातील रविश्चंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हेदेखील उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. परंतु, या गोलंदाजाची विशेषता ही आहे की, त्याने जगातील प्रत्येक खेळपट्टीवर विकेट घेतली आहे. केवळ आशियामध्ये नाही तर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या मैदानावरही त्याचे गोलंदाजी प्रदर्शन शानदार आहे. हा गोलंदाज अजून कोण नसून तो आहे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लायन.
आज याच नेथन लायनच्या नावावर १०० कसोटी सामन्यांची नोंद झाली आहे. नेथनने केवळ ९ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत यशाचे शिखर गाठले आहे. पण, त्याच्यासाठी हे करणे सोपे नव्हते. सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हा यशस्वी गोलंदाज एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर गवत कापायचे काम करत असायचा.
तर जाणून घेऊया, नक्की असं काय घडलं की हा गवत कापणारा सर्वसामान्य व्यक्ती ऑस्ट्रेलिया संघाचा दमदार गोलंदाज कसा बनला. Nathan Lyon from pitch curator to greatest off spinner journy.
नेथन हा त्याच्या युवा वयात ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेडमधील ओव्हल स्टेडियमवर ग्राउंड्समनचे काम करत असायचा. त्याला मैदानावरचे गवत काढायचे आणि खेळपट्टीची व्यवस्थित देखरेख करणे, ही कामे करावी लागायची. पण, फक्त ७ महिन्यात त्याचे नशीब असे बदलले की, तो ऑस्ट्रेलियातील ग्राउंड्समनपासून थेट ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू बनला. विशेष म्हणजे, त्याने संघात पदार्पण करण्यापुर्वी देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी सामना तो केवळ ६ महिने आधी खेळला होता.
प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या सर्वसामान्य मुलांप्रमाणे नेथनचेही स्वप्न होते की, आपण मोठे झाल्यानंतर क्रिकेटपटू बनावे. न्यू साउथ वेल्सच्या यंग शहरात जन्मलेला नेथन लहान असतानाच त्याच्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये राहायला गेला. तिथे त्याने एसटी क्रिकेटमध्ये १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील क्रिकेट खेळले.
सन २००८मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट चषकात दक्षिण ऑस्ट्रेलिया दुसरा एकादश संघाविरुद्ध पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी एक विकेट घेतली होती. यादरम्यान त्याची भेट दक्षिण ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक मार्क हिग्स यांच्यासोबत झाली. हिग्स यांना नेथनची शैली खूप आवडली आणि तिथून त्यांनी त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
साधारण २ वर्षे नेथन अशाप्रकारेच वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. मात्र, २०१०मध्ये त्याने ऍडलेडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यामागचे कारण हे होते की, नेथनचे वय झाले होते आणि त्याला अजूनपर्यंत तरी क्रिकेटमध्ये हवे तेवढे यश मिळाले नव्हते. म्हणून त्याने पैसे कमावण्यासाठी क्रिकेट सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. हिग्स यांच्या सहकार्याने नेथनला ऍडलेडच्या ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर ग्राउंडमन अर्थात कर्मचाऱ्याची नोकरी मिळाली.
त्यावेळी (२०१०-११मध्ये) ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश स्पर्धा खूप प्रसिद्ध होती. ऍडलेड ओव्हल हे देशांतर्गत संघ वेस्टइंड रेडबॅकचे सरावासाठीचे मैदान होते. रेडबॅकचे प्रशिक्षक डॅरेन बॅरी यांनी आपल्या खेळाडूंसोबत स्टेडियमधच्या मध्य खेळपट्टीवर सराव करायचे ठरवले होते. पण, त्यांच्या संघात एका खेळाडूची कमी होती. तेव्हा त्यांच्या संघातील एक खेळाडू ‘तो खूप चांगला फिरकी गोलंदाज असल्याचे’ सांगत नेथनकडे बोट करत होता.
नेथन त्यावेळी खेळपट्टीवर रोलर चालवत होता. बॅरी यांनी नेथनला बोलावले आणि संघात गोलंदाजी करायला साांगितले. पण, नेथनने सुरुवातीला नकार दिला. शेवटी बॅरी यांनी त्याला तयार केले. नेथनने फक्त ३-४ चेंडू गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीमध्ये बॅरी यांना ड्रिफ्ट आणि लूप जाणवला. ते पाहून थक्क झालेल्या बॅरी यांनी म्हटले, “हे तर खूप विशेष कौशल्य आहे. हा साधारण गोलंदाज नाही.”
बॅरी यांनी नेथनच्या गोलंदाजीला पाहून प्रभावित होऊन दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे डायरेक्टर आणि तत्कालिन ऑस्ट्रेलिया संघाचे निवडकर्ता कॉक्स यांना फोन केला आणि नेथनला बिग बॅश लीगमध्ये खेळवण्याची विनंती केली. परंतु नेथन कोणत्याही मोठ्या लीगमध्ये खेळला नसल्याने कॉक्स यांनी सुरुवातीला नकार दिला. पण वास्तवात त्याची गोलंदाजी पाहून त्यांनी त्याला खेळण्याची परवानगी दिली.
ही लीग टूराक पार्कमध्ये झाली होती आणि नेथनने या लीगमध्ये रेडबॅक संघाकडून खेळताना पहिल्या सामन्यातच १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने संपूर्ण लीगमध्ये ७ सामने खेळत सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या होत्या. एवढेच नाही तर त्याच्या कामगिरीने रेडबॅक संघाने तो हंगामही जिंकला होता. पुढे त्याची ऑस्ट्रेलिया अ संघात निवड झाली. त्यावेळी त्याने झिम्बाब्वेमधील अ दर्जाच्या तिरंगी मालिकेत ११ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो मालिकावीर ठरला होता.
एवढेच नाही तर, नेथनची ऑगस्ट २०११मधील श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली होती. अशाप्रकारे त्याने कसोटीत पदार्पण करत पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट घेतली होती. विशेष म्हणजे ही विकेट श्रीलंकाचा दिग्गज फलंदाज कुमार संगाकाराची होती. त्या पूर्ण कसोटी सामन्यात त्याने ३४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने तो सामना १२५ धावांनी जिंकला होता.
नेथनने कसोटीतील त्याच्या पहिल्या चेंडूवरील पहिल्या विकेटने हे सिद्ध करुन दाखवले की तो कसोटी क्रिकेटसाठीच बनला आहे. तो ऑस्ट्रेलयाच्या शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वोत्कृष्ट तिसरा गोलंदाज आहे.
नेथनने त्याच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत १०० सामने खेळत एकूण ३९६ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या एका डावातील ८ विकेट्सचाही समावेश आहे. तसेच वनडेत त्याने २९ सामन्यात २९ तर टी२०त २ सामन्यात एक विकेट घेतली आहे. नेथनने देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेेणीमध्ये ५८७ विकेट्स घेतल्या आहेत. तर अ दर्जांच्या क्रिकेटमध्ये ७२ सामन्यात ८४ विकेट्स आणि टी२० लीग क्रिकेटमध्ये ४६ सामन्यात ५४ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
एकाच कसोटी सामन्यात १०० व ० धावा करणारे ५ भारतीय खेळाडू
अंडर १९ विश्वचषकात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकणारे ५ भारतीय दिग्गज
कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ प्रसिध्द गोलंदाज