---Advertisement---

रोहित शर्मासाठी कुणाला मिळणार टीम इंडियातून डच्चू? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला लागली उत्सुकता

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 2:28 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक घडीवर आहे. दोन्ही संघांनी पहिल्या दोन सामन्यात प्रत्येकी एक विजय मिळवत मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. त्यामुळे ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. त्यातही विस्फोटक फलंदाज रोहित शर्माला तिसऱ्या सामन्याचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे रोहितसाठी भारतीय संघ कोणत्या खेळाडूला डच्चू देईल, हे पाहणे रोमांचक असणार असल्याचे वक्तव्य नॅथन लायनने केले आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू लायनने एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “सर्वांना माहिती आहे रोहित भारतीय संघातील सर्वात श्रेयस्कर खेळाडू आहे. अशात त्याला संघाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात सामील करण्यासाठी भारतीय संघ कुणाला बाहेर करेल?, याची मला उत्सुकता लागली आहे.”

तसेच पुढे बोलताना लायन म्हणाला की, “तो भारतीय संघातील एक मोठा प्रभावशाली क्रिकेटपटू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजापुढे त्याला बाद करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. असे असले तरी, आमच्याकडे रोहितला बाद करण्याची योजना आहे. अपेक्षा करतो की लवकरच आम्ही रोहितला भेटू.”

नॅथन लायनने केले रहाणेचे कौतुक 

भारतीय कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाचीही लायनने प्रशंसा केली. तो म्हणाला की, “रहाणे एक विश्वस्तरीय फलंदाज आहे. त्याच्यातील साहसाची छबी आम्ही मैदानावर पाहिली आहे. तो सहजासहजी हार मानत नाही. तो खूप शांत व्यक्ती आहे. मैदानावर तो कसल्याही प्रकारची स्लेजिंग करत नाही. तसेच तो मैदानावर खेळताना जास्त बोलतही नाही. यावेळी तो संघनायक बनून आमच्यापुढे उभा आहे. आशा करतो की, आमच्याकडे सिडनीच्या मैदानावर त्याचा सामना करण्यासाठी योजना असणार आहे.”

आधी पुजारा होता संघाचा उपकर्णधार

आयपीएल २०२० दरम्यान रोहितला दुखापत झाली होती. याचमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांना मुकला आहे. परंतु, दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर रोहितने ३० डिसेंबरला भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर रोहितला उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे माघारी परतल्याने संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती सोपवण्यात आले आहे. तर बॉक्सिंग डे कसोटीमध्ये उपकर्णधार चेतेश्वर पुजारा होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---