नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतने मागील वर्षीच्या उपविजत्या लक्ष्य सेन विरुद्ध उपांत्य सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.
१६ वर्षांच्या लक्ष्यने श्रीकांतला चांगली लढत दिली परंतु श्रीकांतने आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या जोरावर या लढतीत २१-१६, २१-१८ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
लढतीच्या पहिल्या सेटमध्ये दोघेही एकमेकांना बरोबरीची टक्कर देत होते. हा सेट एका क्षणी ९-९ असा बरोबरीत होता. परंतु श्रीकांतने हळूहळू आघाडी वाढवत नेऊन अखेर सेट २१-१६ असा जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली.
सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये सुरवातीला श्रीकांतने वर्चस्व राखले होते परंतु लक्ष्यने चांगले पुनरागमन करत हा सेट १२-१२ असा बरोबरीत आणला. त्याने श्रीकांतविरुद्ध चांगली झुंज दिली परंतु अखेर श्रीकांतने अटीतटीच्या झालेल्या या सेटमध्ये २१-१८ असा विजय मिळवून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
श्रीकांतच्या अंतिम फेरीतील सामना जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असणाऱ्या एचएस प्रणॉयशी होणार आहे.
याआधीही नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंच ओपन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रणॉय आणि श्रीकांतमध्ये सामना रंगला होता. या सामन्यात श्रीकांतने विजय मिळवला होता. तसेच ही स्पर्धाही तो जिंकला आहे.