नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत रेवती देवस्थळे विरुद्ध विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
सिंधूने हा सामना २१-१६, २१-०२ असा सरळ सेटमध्ये जिंकला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये रेवतीने चांगला खेळ केला होता. तिने सुरवातीलाच ६-४ अशी आघाडी मिळवली होती. नंतर हा सेट ९-९ असा बरोबरीचा झाला.
या नंतर मात्र सिंधूने तिच्या अनुभवाच्या जोरावर रेवतीला आघाडीवर जाण्यापासून रोखले आणि अखेर सेट २१-१६ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने रेवतीला कोणतीही संधी दिली नाही. तिने १-१ अश्या सुरवातीनंतर १९-१ अशी भरभक्कम आघाडी घेतली आणि हा सेट २१-२ असा सहज जिंकत सामनाही आपल्या नावावर केला.