नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालने पी व्ही सिंधूचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या सामन्यात सायनाने सिंधूवर २१-१७,२७-२५ असा विजय मिळवला.
या सामन्यात चाहत्यांना चुरस अपेक्षित होती आणि या दोघींनीही त्यांच्या चाहत्यांना नाराज केले नाही. पहिल्या सेटमध्ये चांगली लढत बघायला मिळाली. या सेटची सुरुवात सायनाने आक्रमक केली तिने सुरवातीपासून सिंधूवर आघाडी मिळवली होती, परंतु सिंधुही तिला चांगली टक्कर देत होती. या सेट मध्ये सायना १७-१३ अश्या आघाडीवर असताना सिंधूने चांगला खेळ करत १७-१६ अशी आघाडी कमी केली. परंतु अखेर सायनाने हा सेट २१-१७ असा जिंकला.
दुसरा सेट खूपच चुरशीचा झाला. या सेटमध्ये सिंधूने चांगली सुरुवात केली परंतु सायनाने ६-६ अशी बरोबरी केली. नंतर मात्र सिंधूने पुन्हा चांगला खेळ करत ११-८ अशी आघाडी घेतली. या सेट मध्ये दोघीही हार मानायला तयार नव्हत्या अखेरच्या क्षणापर्यंत हा सेट कोण जिंकेल हे सांगणे कठीण होते. त्यांनी २५-२५ अशी बरोबरी केली होती. अखेर सायनाने अटीतटीच्या झालेल्या या सेटमध्ये २७-२५ असा विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
बॅडमिंटन चाहत्यांसाठी आजचा दिवस म्हणजे एक आनंदाची पर्वणी ठरली. आज त्यांना भारताचे स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत विरुद्ध एच एस प्रणॉय, सायना विरुद्ध सिंधू तसेच अश्विनी पोनप्पा, सिक्की रेड्डी, सात्विक साईराज आणि प्रणव जेरी चॉपर यांचे सामने पाहायला मिळाले. आज अंतिम फेरीत रंगलेले सर्वच सामने रंगतदार झाले.