पुणे – कबड्डी आणि कुस्तीसारख्या मर्दानी खेळात नावलौकिक मिळविलेले राष्ट्रीय खेळाडू सुरेश नांगरे यांचे सोमवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
वडील भागुजीबुवा नामांकित वस्ताद असल्यामुळे घरातूनच त्यांना खेळाचे बाळकडू मिळाले. शालेय जीवनापासून कुस्ती आणि कबड्डीशी त्यांची नाळ जोडली गेली. या दोन्ही खेळात त्यांनी आपला नावलौकिक मिळविला. जगोबादादा तालमीत घडलेल्या सुरेश नांगरे यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला होता. मित्र परिवारात आणि कबड्डी वर्तुळात ते नाना म्हणून परिचीत होते. विशेष म्हणजे उभरत्या काळात नांगरे यांनी कुस्ती आणि कबड्डी या दोन्ही खेळात राज्याचे प्रतिनिधीत्व केले. पुढे बदामी हौद संघाची स्थापना करून त्यांनी संघटनात्मक स्तरावरही भरीव योगदान दिले. महाराष्ट्र बॅंकेत नोकरीला असताना खेळाडूंना नोकरी देण्यात नांगरे यांचा पुढाकार होता. केवळ खेळातच नाही, तर बॅंकेत काम करत असताना बॅंक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती.
खेळाडूंबरोबरच बॅंक कर्मचाऱ्यांना घडविणारा संघटक गेला अशी भावना बॅंक ऑफ महाराष्ट्राचे खेळाडू अर्जुनवीर शांताराम जाधव यांनी व्यक्त केली. पुणे मुबंईतील कबड्डी जिवंत ठेवण्याची कामगिरी करणारा कार्यकार्ता आणि खेळाडूंचा आधारस्तंभ आज आपल्याला सोडून गेला अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केली. नाना कबड्डी वर्तुळातील मोठे व्यक्तीमत्व होते. खेळाडूंना नोकरी उपलब्ध करून देताना तो कोणत्या संघाचा याचा कधीही त्यांनी विचार केला नाही. ते खेळाडूंचे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या कबड्डीमध्ये एक पोकळी निर्माण झाली, अशी भावना राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केली. (National kabaddi player Suresh Nangre passed away)
महत्वाच्या बातम्या –
‘जगात सर्वात जास्त दबाव टीम इंडियावर…’, विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे लक्षवेधी विधान
आधी विराट, मग अनुष्का! विश्वचषकापूर्वी जोडप्याने तिकीटे मागण्यावरून मित्रांना केली खास अपील, स्टोरी व्हायरल