नाशिक : २० ते २४ सप्टेंबर दरम्यान पुणे येथे होणाऱ्या १४ व्या राष्ट्रीय एमटीबी अजिंक्यपद स्पर्धेसाठी दुडगाव, महिरावणी, नाशिक येथे पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत खुल्या पुरुष गटात नाशिकच्या गोपीनाथ मुंडे आणि अरुण भोये तसेच युथ गटात निसर्ग भामरे यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या खुल्या गटात नाशिकची अनुजा उगले तर सब ज्युनिअर गटात रीशिका लालवाणी यांची निवड झाली आहे. ओरोबोरस या सायकल उत्पादक कंपनीच्या सहकार्याने प्रथमच नाशिकमध्ये झालेल्या या स्पर्धा अतिशय अटीतटीच्या झाल्या असल्याने निवड समितीने निकाल दोन दिवसासाठी राखून ठेवला होता.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनने सक्रीय सहभाग घेत स्पर्धेसाठी लागणाऱ्या सुविधा पुरवत सहकार्य केले.
१४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १८ वर्षाखालील आणि खुला अशा मुले व मुलींच्या आठ गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा २० जणांचा संघ पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आला आहे. खुल्या पुरुष व महिला गटात प्रत्येकी ४ तर इतर गटात प्रत्येकी २ अशा आठ गाता एकूण २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
संजय साठे, मीनाक्षी ठाकूर आणि नितीन नागरे यांची त्रिसदस्यीय निवड समिती खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करत संघ निवडला आहे.
मुलींमध्ये नाशिकची स्टार स्विमर सायकलीस्ट अनुजा उगले हिने अपेक्षेप्रमाणे यश मिळवत महिलांच्या खुल्या गटात १३ मिनिट ८ सेकंदात अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवत संघात प्रवेश मिळवला. अनुजाने आत्ताच बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या अनुजा उगले हिने कांस्य पदक मिळवत पुढील वर्षी होणाऱ्या एशियन गेम्स साठीच्या प्रशिक्षण शिबिरासाठी तिची निवड झाली आहे.
तर मुलींच्या सबज्यूनिअर गटात रीशिका लालवाणी हिने १७ मिनिट ११ सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. रीशिकाने सुद्धा जुलै महिन्यात झालेल्या पुणे बारामती सायकल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवत स्पर्धा गाजवली आहे.
पुरुष खुल्या गटात एकूण ४ खेळाडूंची निवड करण्यात आली असून आजवर अनेक एमटीबी स्पर्धा गाजवणारे नाशिकचे गोपीनाथ मुंडे (९ मिनिट ४२ सेकंद) आणि अरुण भोये (१० मिनिट) यांनी अनुक्रमे दुसरा व चौथा क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघात प्रवेश मिळवला. पुणेचा विठ्ठल भोसले (९ मिनिट २९ सेकंद) याने प्रथम तर भीम रोकाया (९ मिनिट ४५ सेकंद) याने तिसरा क्रमांक पटकावला. अरुण पाठोपाठ भारत सोनवणे यानेही १० मिनिट ५ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली.
युथ मुलांमध्ये नाशिकच्या निसर्ग भामरेने ११ मिनिट २९ सेकंदात अंतर पूर्ण करत यश मिळवले. या गटात पुणेच्या मंगेश ताकमोगे याने प्रथम क्रमांक पटकावला. या पाठोपाठ युथ मुलींच्या गटात शिया लालवाणी हिने तिसरा क्रम्नक मिळवत राखीव खेल्दुन्मध्ये स्थान मिळवले.
त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात एमटीबी सारख्या स्पर्धांसाठी लागणाऱ्या सर्वोत्तम वातावरणात झालेल्या या निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातून विविध वयोगटातील तब्बल १८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात कोल्हापूर, पुणे, सांगली, नांदेड अशा जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांची संख्या मोठी होती.