ब्रिस्बेन। भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून(१५ जानेवारी) सुरु झाला आहे. मात्र ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे भारताच्या दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंमध्ये आता आणखी एका खेळाडूची भर पडली आहे.
याआधीच भारताचे ८-९ खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. याच कारणाने ब्रिस्बेन कसोटीसाठी भारताला तब्बल ४ बदल ११ जणांच्या संघात करावे लागले आहेत. त्यातही आता सैनीला देखील दुखापत झाल्याने भारतासमोरचे आव्हान वाढले आहे.
सैनीला या सामन्यात ३५ वे षटक चालू असताना ५ व्या चेंडू टाकल्यानंतर मांडीच्या स्नायुंवर ताण जाणवू लागला. त्यामुळे भारताचे फिजिओ मैदानावर आले होते. त्यांनी त्याला मैदानातून बाहेर नेले. त्यामुळे सैनीच्या षटकातील उर्वरित १ चेंडू रोहित शर्माने टाकला.
सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की सैनी त्याच्या मांडीमध्ये वेदना जाणवत असल्याची तक्रार करत आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवून आहे.
Navdeep Saini has complained of pain in his groin. He is currently being monitored by the BCCI medical team.#AUSvIND pic.twitter.com/NXinlnZ9W5
— BCCI (@BCCI) January 15, 2021
भारताला दुखापतींचे ग्रहण –
काही दिवसांपूर्वीच सिडनी येथे पार पडलेल्या कसोटी दरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते आधीच ब्रिस्बेन कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. एवढेच नाही तर चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विहारी, रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होणारा पहिले भारतीय खेळाडू नाही. त्यांच्याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली. तसेच ब्रिस्बेन कसोटीआधी जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण आल्याने आणि आर अश्विनला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने त्यांनाही या कसोटीतून बाहेर पडावे लागले.
तसेच इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या दौऱ्याआधीच दुखापतग्रस्त असल्याने त्यांची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्याचबरोबर रोहित शर्मा देखील दुखापतीमुळे वनडे, टी२० मालिकेत आणि कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत १०० कसोटी सामने
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’