भारतात देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या दुलीप ट्रॉफी खेळली जात आहे. नव्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा खास समजल्या जाणाऱ्या खेळाडूनं बॅट आणि बॉलनं कहर केला. हा खेळाडू तीन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. मात्र गंभीरच्या आगमनानंतर त्याचं नशीब चमकू शकतं.
या खेळाडूचं नावे आहे नवदीप सैनी. तो दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाकडून खेळतोय. इंडिया ए विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात नवदीपनं प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. त्यानं त्याच्या खेळानं सर्वांनाच प्रभावित केलंय.
या सामन्यात नवदीप सैनीनं प्रथम फलंदाजीत आपली कमाल दाखवली. त्यानं मुशीर खानला (181 धावा) उत्तम साथ दिली. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 205 धावांची भागिदारी झाली, ज्यामुळे संघाची पडझड थांबली. नवदीपनं 144 चेंडूंत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 56 धावा केल्या. मुशीर आणि नवदीप यांच्या भागिदारीमुळे भारत बी संघानं 321 धावा फलकावर लगावल्या.
फलंदाजीनंतर नवदीप सैनीनं गोलंदाजीत आपला जलवा दाखवला. त्यानं सुरुवातीलाच भारत ए संघाच्या तीन मोठ्या फलंदाजांना तंबूत धाडलं. कर्णधार शुबमन गिल त्याचा पहिला बळी ठरला. गिलला केवळ 25 धावा करता आल्या. यानंतर त्यानं 36 धावा करणाऱ्या मयंक अग्रवालला बाद केलं. नवदीपचा तिसरा बळी ठरला तो ध्रुव जुरेल. त्यानं केवळ 2 धावा केल्या.
नवदीप सैनी हा तोच खेळाडू आहे, ज्याच्यासाठी गौतम गंभीर दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये लढला होता. गंभीर दिल्लीचा कर्णधार असताना त्यानं नवदीपला खेळताना पाहिलं होतं. त्यानंतर त्याला संघात आणण्यासाठी गंभीरनं निवडकर्त्यांशी संघर्ष केला होता. सैनीनं देखील गंभीरची अनेकदा प्रशंसा केली आहे. नवदीप सैनीनं 2021 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. आता या कामगिरीमुळे आणि गंभीरचा फेव्हरेट असल्यामुळे त्याचं भारतीय संघात पुनरागमन निश्चित मानलं जातंय.
हेही वाचा –
मोठा धक्का! यावर्षी पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही हा स्टार गोलंदाज; काय आहे कारण?
केएल राहुलला झालं तरी काय? दुलीप ट्रॉफीतही सूर गवसेना, कसोटी संघातील स्थान डळमळीत
“टायगर अभी जिंदा है…”, UP T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारची खतरनाक गोलंदाजी, फलंदाजांना काहीच सुचेना!