सायकलप्रेमींचे लाडके असलेल्या जसपाल सिंग विर्दी यांचे मागील वर्षी 8 जुलै रोजी एका सायकल राईड दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेकांना चटका देणाऱ्या या बातमीने नाशिक हळहळले. क्रीडाप्रेमींना हा एकप्रकारे धक्काच होता. जसपाल सिंग यांनी नाशिकमध्ये सायकल चळवळ रुजवण्यासाठी अनेकप्रकारे प्रयत्न केले. नाशिक शहराला सायकल कॅपिटल बनविण्याचे त्यांचे प्रयत्न होते. नाशिकमधील प्रत्येक सायकलप्रेमी जसपालसिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे.
याचवेळी जसपालसिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या नाशिक सायकलिस्टचा महत्वपूर्ण उपक्रम एनआरएम सायककिंगच्या दुसऱ्या पर्वातील सातव्या राईडचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 6 वाजता सुरू झालेली ही राईड हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून 40 किमीसाठी राईड नाशिक-अंजनेरी-नाशिक तर 80 किमीची राईड त्र्यंबकेश्वर महामार्गाने आंबोली फाटा, कश्यपी डॅम, गिरनारे ते नाशिक अशा मार्गावरून जसपालसिंग प्रेमी सायकलीस्ट्सने पूर्ण केली. 136 सायकलीस्ट्सने 80 किमी तर 76 सायकलीस्ट्सने 40 किमीची राईड मध्ये सहभाग घेऊन वेळेत राईड पूर्ण केली आहे. अनोखा प्रयोग करताना डॉ. मनीषा रौंदळ यांनी मुलगी अपूर्वा सोबत टँडम सायकलवर 80 किमीची राईड पूर्ण केली.
यावेळी जसपाल सिंग यांचे काका प्रीतपाल सिंग विर्दी, मुलगा हरजस सिंग विर्दी, एनसीएफचे मार्गदर्शक हरिषजी बैजल, दातार जेनेटिक्सच्या स्मृती दातार, मिलिंद अग्निहोत्री, एनसीएफचे सचिव नितीन भोसले, राजेंद्र वानखेडे, शैलेश राजहंस, ऍड. वैभव शेटे, योगेश शिंदे, रत्नाकर आहेर, राजेंद्र नाना फड, आदी सदस्य उपस्थित होते.
मोठ्या संख्येने या राईडमध्ये सहभागी झाल्याबद्दल नाशिक सायकलीस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी आभार मानले. या राईडला मिळालेला प्रतिसाद बघता जसपाल सिंग यांनी नाशिकमध्ये सायकल चळवळ वाढवताना जनमानसांत मिळवलेले प्रेम चिरंतर राहणार असल्याचे ते म्हणाले.
जसपाल सिंग स्मृती राईड यशस्वी होण्यासाठी एनआरएम हेड नीता नारंग, सोफिया कपाडिया, नितीन कोतकर यांनी प्रयत्न केले.
याअंतर्गत दीपक भोसले याचेकडून जसपालसिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावरकर जलतरण तलावाच्या वाहनतळावर सायकल स्टँड लावण्यात आला.