नाशिक : नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आणि हॉटेल एसएसके सॉलेटीर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. #बीब्राईट #बीबोल्ड #बीफॅॅब्युलस म्हणजेच ‘धाडसी बना, आनंदी राहा, उत्कृष्ट बना’ असा नारा देत येत्या १० मार्चला सकाळी ७ वाजता जागतिक महिला दिनाच्या
निमित्ताने महिला सबलीकरणासाठी महिलांसाठी ‘ट्रेजर हंट’चे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक सायकलीस्टतर्फे महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून या महिला सायकल रॅलीचे नियोजन सायकलीस्टच्या महिला सदस्यांनी केले आहे.
विशेष असे ट्रेजर हंट यावेळी घेण्यात येणार असून महिलांच्या शोधक वृत्तीला यातून चालना मिळणार आहे. हे ट्रेजर हंट हॉटेल एसएसके सॉलेटीर तिडके कॉलनी येथून सुरु होऊन १० किमीचा फेरा करून पुन्हा येथेच समाप्त होईल. ट्रेजर हंट मध्ये नाशिक शहरातील महत्वाचे ठिकाणी जाऊन पुरावे शोधत तेथून एक वस्तू घेऊन तेथे असलेल्या पुराव्या नुसार पुढच्या ठिकाणी पोहचणे जरुरीचे असते. अशा पद्धतीने शोध घेत संघाला एसएसके सॉलेटीर येथे पोहचणे आवश्यक आहे.
शहरात सायकलचा प्रचार आणि पर्यावरणाचा जागर होणे याबरोबरच महिलांमधील तर्कशक्ती, धाडस वाढवणे यातून सक्षमीकरण हा यामागील महत्वाचा उद्देश आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या रॅली दरम्यान नाशिक सायकलीस्टचे ५० हून अधिक स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान अनेक उपक्रम राबवले जाणार असून सर्वात चांगली सजवलेली सायकल, उत्तम पेहराव, स्लोगन स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘मला सायकलिंग आवडते कारण ……. अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात येऊन सहभागी महिलेला लकी ड्रॉ द्वारे विशेष बक्षीस मिळणार आहे. सहभागी होणाऱ्या एका महिलेला लकी ड्रॉ मधून एक सायकल मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असणार आहे.
नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेल्या ५० महिला पोलीस, भारतीय वायुसेनेच्या महिला सैनिक, नाशिक जिल्हा रुग्णालयातील महिला नर्स तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५० हून अधिक महिलांना या रॅलीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात शैक्षणिक, ग्रामीण, उद्योग, खेळ, पत्रकारिता, तंत्रज्ञान, आदी क्षेत्रांसह महाविद्यालयीन तरुणींचाही यात समावेश आहे.
‘ट्रेजर हंट’ रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठीच्या अधिक माहितीकरिता ७४४७७७८८४४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन नाशिक सायकलीस्टकडून करण्यात आले आहे.