इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताचा भालाफेकपटू निरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. तो एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा भारताचा पहिला भालाफेकपटू ठरला आहे.
या वर्षीच्या एशियन गेम्ससाठी भारतीय चमूचा ध्वजधारक असलेला निरजने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱ्या प्रयत्नात 88.06 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक जिंकले. हे भारताचे एशियन गेम्स 2018 मधील आठवे सुवर्णपदक ठरले आहे.
20 वर्षीय निरजने या सुवर्णपदकाबरोबरच वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमही नोंदवला आहे. मात्र त्याचा एशियन गेम्सचा विक्रम थोडक्यात 1.09 मीटरने हुकला.
याआधी भारताकडून 1982 च्या एशियन गेम्समध्ये गुरतेज सिंगने भालाफेकीतील पहिले पदक मिळवून दिले होते. त्यांनी भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेकीत निरजने पहिल्यांदा भारताला पदक मिळवून दिले आहे.
निरजने अंतिम फेरीत पहिल्या प्रयत्नात 83.46 मीटरचा थ्रो केला होता. मात्र त्याचा दुसरा प्रयत्न अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. त्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत 88.06मीटरचा थ्रो केला. यानंतर त्याने चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात अनुक्रमे 83.25मीटर आणि 86.26 मीटर असा थ्रो केला.
या स्पर्धेत चीनच्या क्विझेन लीउने पहिल्या प्रयत्नात 82.22 मीटरचा थ्रो करत रौप्यपदक तर पाकिस्तानच्या नदीम अर्शदने चौथ्या प्रयत्नात 80.75 मीटरचा थ्रो करत कांस्यपदकाला गवसणी घातली.
यास्पर्धेत चायनीज तैपईच्या चेन्ग चाओ त्सुन विरुद्ध निरजला संघर्ष करावा लागेल असे वाटले होते परंतू चेन्ग चाओ त्सुनला 80 मीटरचा टप्पा एकदाही गाठता आला नाही.
त्याचबरोबर भारताचाच शिवापाल सिंगला खांद्याच्या दुखापतीमुळे ही स्पर्धा 2 प्रयत्नानंतर अर्ध्यातच सोडावी लागली. तो यात आठव्या क्रमांकावर राहिला.
याआधी निरजने यावर्षी गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच त्याने 2016ला पोलंडला झालेल्या वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक मिळवले होते.
निरजचे हे पदक भारताचे या स्पर्धेतील 41 वे पदक ठरले असून भारताने यात 8 सुवर्णपदके, 13 रौप्यपदके आणि 20 कांस्यपदके मिळवली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघ उंपात्य फेरीत दाखल; कर्णधार राणी रामपालची हॅट्रिक
–एशियन गेम्स: सायना नेहवालचे हे पदक का आहे भारतासाठी खास?
–पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास