भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आशिष नेहराच्या भारतीय टी२० संघातील समावेशाने अजिबात आश्चर्यचकित झाला नाही. ह्या वयात नेहराला भारतीय संघात स्थान दिल्यामुळे आणि टी२० विश्वचषकाला अजून ३ वर्षांचा अवधी असल्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
इंडिया टीव्हीशी बोलताना सेहवाग म्हणाला, ” मला नेहराच्या निवडीवरून अजिबात आश्चर्य वाटत नाही. मला त्याचा भारतीय संघात समावेश झाला याचा आनंद आहे. त्याने भविष्यातही अनेक सामने खेळावे. ”
सेहवाग पुढे म्हणतो, ” नेहरा दिवसात दोन वेळा मिळून ८ तास जिम करतो. हाच त्याच्या तंदरुस्तीचा राज आहे. तो सध्या भारतीय संघात आहे कारण तो यो-यो टेस्ट पास झाला आहे. त्याने १७ ते १८ गुण हे यो-यो टेस्टमध्ये मिळवले आहेत. त्याने यो-यो टेस्टमध्ये विराटच्या गुणांना स्पर्श केला आहे.”
” नेहरा हा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला धावताना कोणतीही अडचण येत नाही. त्याचमुळे यो-यो टेस्ट पास होताना त्याला कोणतीही अडचण येत नाही. “
तीन वर्षांनी होणाऱ्या टी२० विश्वचषकात नेहराच्या समावेशाबद्दल सेहवाग म्हणतो, ” मला नाही वाटत वय हा नेहरासाठी अडसर ठरेल. जर तो फिट असेल आणि विकेट्स घेत कमी धावा देत असेल तर त्याला नक्की संधी मिळेल. सनथ जयसूर्या वयाच्या ४२व्या तर सचिन ४०व्या वयापर्यंत क्रिकेट खेळत होते मग नेहरा का नाही,? “