आयपीएल २०२६ चा उत्साह केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावत आहे, मात्र या आनंदाच्या वातावरणात एक वाईट बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या गोलंदाजावर बंदी घालण्यात आली आहे. त्या खेळाडूने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे लोक संतप्त झाले असून त्या खेळाडूवर कारवाईही करण्यात आली आहे.
नेपाळच्या करण केसी याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यामुळे लोक चिढले. त्यासाठी एक तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये करणवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तीन वेळा पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला होता. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर सामना शुल्कासह १०० टक्के दंडही आकारण्यात आला आहे. नेमके त्याने काय पोस्ट केले ते जाणून घेऊ.
करणने शनिवारी (११ एप्रिल) पंतप्रधान चषक वनडे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळताना हे कृत्य केले. त्याने सोशल मीडियावर लिहिले, सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूने चुकून पंचांना मारल्यास काय होईल. त्याच्या या पोस्टमुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून त्यांचा निषेध नोंदवला.
करणने पंचांची कठोर भुमिका पाहून ती पोस्ट डिलीट केली आणि त्यांची माफीही मागितली, मात्र पंचांच्या मते केवळ माफी मागणे पुरेसे नाही. त्यांनी नेपाळ क्रिकेट असोसिएशनकडे त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळेच त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आणि दंडही ठोठावण्यात आला.
करणने तीन वेळा पहिल्या चेंडूवर विकेट्स घेण्याची कामगिरी २०२४ मध्ये हॉंगकॉंग विरुद्ध केली होती. तो नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी संघाचा भागही होता. तो एक अष्टपैलू खेळाडू असून वेगवान गोलंदाजी करतो. त्याने ६५ वनडे आणि ८८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.






