टी२० वर्ल्ड कप २०२६ चा पहिला सामना श्रीलंका येथील कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने अखेर ३ गडी राखून विजय मिळवला. एक वेळ अशी वाटत होती की पाकिस्तान हा सामना हरेल, पण नेदरलँड्सच्या एका चुकीने पाकिस्तानला हरलेला सामना जिंकून दिला.
पाकिस्तानला शेवटच्या २ षटकांत २९ धावांची गरज होती आणि संघाने ७ गडी गमावले होते. क्रीजवर अष्टपैलू फहीम अशरफ आणि शाहीन आफ्रिदी उपस्थित होते. संघासाठी फहीम अशरफ हीच शेवटची आशा होती. शाहीनमध्ये देखील षटकार मारण्याची क्षमता असली, तरी १९ व्या षटकात नेदरलँड्सच्या मॅक्स ओ’डॉउडने फहीमचा एक सोपा झेल सोडला.
ज्यावेळी झेल सुटला, तेव्हा फहीमची धावसंख्या १० पेक्षा कमी होती. त्यानंतर त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत पाकिस्तानला विजयाच्या रेषेपार नेले. फहीमने ११ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद २९ धावा केल्या आणि पाकिस्तानला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.
विशेष म्हणजे, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला नेदरलँड्सचा संघ १९.५ षटकांत १४७ धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून स्कॉट एडवर्डने २९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ३७ धावा केल्या. पाकिस्तानकडून सलमान मिर्झाने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याशिवाय मोहम्मद नवाज, अबरार अहमद आणि सैम अयूब यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर शाहीन आफ्रिदीला १ बळी मिळाला.
विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने १९.३ षटकांत १४८/७ धावा करून विजय मिळवला. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने ३१ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.






