मागील दोन आठवड्यांपासून चर्चेत असलेली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक बिनविरोध पार पडली. मुंबई येथे झालेल्या बीसीसीआयच्या 91 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयच्या अनेक प्रशासकीय पदांवर नवीन नियुक्त्या केल्या गेल्या. सौरव गांगुली यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्याचबरोबर इतरही अनेक पदांवर बदल झालेले दिसले.
???? Update ????: 91st Annual General Meeting of BCCI
The 91st Annual General Meeting of the Board of Control for Cricket in India (BCCI) was held on October 18th, 2022, in Mumbai.
The key decisions made are as under ????https://t.co/c2XV2W2Opl
— BCCI (@BCCI) October 18, 2022
भारताच्या विश्वविजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले अष्टपैलू रॉजर बिन्नी बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून पद ग्रहण करतील. त्यांच्यासोबतच काँग्रेसचे राज्यसभा खासदार व यापूर्वी देखील बीसीसीआयमध्ये विविध पदे भूषवलेले राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून आणखी एक कार्यकाळ काम पाहतील.
मागील तीन वर्षापासून बीसीसीआयचे सचिव म्हणून काम करत असलेले केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे देखील सचिव म्हणून आणखी तीन वर्ष काम करताना दिसतील. त्याचवेळी सहसचिव म्हणून आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव ऍड. देवजित सायकिया हे पदभार स्वीकारतील. सायकिया हे निष्णात वकील तसेच माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व भाजप आमदार आशिष शेलार यांच्याकडे खजिनदारपद देण्यात आले आहे. त्यांनी अरुण धुमल यांची जागा घेतली.
अरुण धुमल यांच्याकडे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन पद देण्यात आले आहे. धुमल हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे मावळते अध्यक्ष अविषेक दालमिया हे या कौन्सिलचे सदस्य असतील. दालमिया यांचे वडील दिवंगत जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयचे प्रमुखपद देखील भूषवले होते. त्यासोबतच वरिष्ठ क्रिकेट प्रशासक एमजेके मुजुमदार हे बीसीसीआयच्या शिखर परिषदेच्या जनरल बॉडीचे सदस्य असतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत भारतीय सदस्य कोण असेल याबाबत बैठकीत चर्चा झाली नाही. निर्णय पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुलगा क्रिकेटर, तर सुन जगप्रसिद्ध स्पोर्ट्स होस्ट, असा आहे बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचा परिवार
बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले रॉजर बिन्नी पाचवेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर! गांगुलीसह ‘या’ तिघांनी भुषविलंय पद






