एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाला अवघे अकरा महिने शिल्लक असताना न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
माईक हेसन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन न्यूझीलंड संघाच्या प्रशिक्षक पदावरून पायऊतार होत असल्याचे जाहिर केले,
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ” येणारे वर्ष न्यूझीलंड क्रिकेटसाठी महत्वाचे आहे. तसेच यावर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. माझ्या काही वैयक्तीक कारणांमुळे माझी मानसिक परीस्थीती ठीक नाही. मी संघाला शंभर टक्के योगदान देईन असे मला वाटत नाही, यामुळे मी हा निर्णय घेत आहे.”
43 वर्षीय हेसन यांची 2012 मधे आश्चर्यकारकरीत्या न्यूझीलंड संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली होती. त्यांच्या कारकिर्दीत न्यूझीलंडने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. तसेच टी-20 क्रमवारीत प्रथम, एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या तर कसोटीमधे तिसऱ्या स्थानी पोहचवले होते.
माईक हेसन यांच्या राजीनाम्यानंतर बोलताना न्यूझीलंड क्रिकेट समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड व्हाईट म्हणाले की, ” माईक हेसन न्यूझीलंडला मिळालेले सर्वात यशस्वी प्रशिक्षक आहेत. त्यांनी त्यांच्या कामगिरीने आंतराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात त्यांचे नाव केले आहे. मी त्यांना विश्वचषकापर्यंत पदावर कायम राहण्यासाठी विनंती केली होती, पण त्यांनी ती नम्रतेने नाकारली.
न्यूझीलंड क्रीकेट संघ ऑक्टोबर- नोव्हेंबरमधे यूएईत पाकि्स्तान विरूध्द तीन कसोटी, पाच एकदिवसीय व एक टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी आम्ही नविन प्रशिक्षकाची निवड करणार आहोत.
यावर्षी आॅस्टेलिया आणि श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी राजीनामा दिला होता.