मुंबई । न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ऍन्थोनी क्रमी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बोर्ड कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकटात सापडले असून खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे. बोर्डाने 15 टक्के कर्मचारी कपात केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे हे धोरण पाहून क्रमी यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे.
मागील आठवड्यात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड वाईट यांनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचारी कमी करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले होते. कर्मचारी कपातीमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा साठ लाख न्यूझीलंड डाॅलरचा अर्थात २९ कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. यामुळे या आर्थिक संकटातून सावरण्यास मदत होणार आहे.
क्रमी आपल्या राजीनाम्याविषयी बोलताना म्हणाले की, ” मी मागील पाच वर्षांपासून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबत काम करत होतो. यावेळी प्रत्येक मिनिटात मी आनंद घेतला. काही मोठ्या योजना राबवण्यावर भरही दिला. त्यातील एक योजना मी पूर्ण करून दाखवली. लोक माझ्या राजीनाम्याचा संबंध कर्मचारी कपातीशी जोडतात तसे नाही. राजीनामा देण्याविषयी मी दोन महिन्यांपूर्वीच विचार केला होता. ही वेळ माझ्यासाठी योग्य होती.”