न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू मार्टिन गुप्टिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. गुप्टिलनं तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. किवी संघाच्या अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये त्याचं योगदान होतं. गुप्टिलनं ऑक्टोबर 2022 पासून संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
मार्टिन गुप्टिलनं 2009 मध्ये न्यूझीलंडकडून पदार्पण केलं होतं. आपल्या कारकिर्दीत त्यानं एकूण 367 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 198 वनडे, 122 टी20 आणि 47 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. गुप्टिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 शतकं झळकावली आहेत. तो न्यूझीलंडसाठी एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा खेळाडू आहे. 2015 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 237 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
निवृत्तीच्या वेळी गुप्टिल हा न्यूझीलंडसाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं 122 सामन्यात 31.81 च्या सरासरीनं 3531 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्यानं दोन शतके आणि 20 अर्धशतकं ठोकली आहेत. कसोटीत या फलंदाजानं 29.38 च्या सरासरीनं 2586 धावा केल्या. गुप्टिलची वनडे कारकीर्द विशेष आठवणीत राहते. येथे त्यानं 41.73 च्या सरासरीनं 7346 धावा केल्या आहेत, ज्यात 18 शतकांचा समावेश आहे.
मार्टिन गुप्टिलनं 119 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 38.43 च्या सरासरीनं 7802 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 17 शतकं आहेत. लिस्ट ए मध्ये 273 सामने खेळणाऱ्या गुप्टिलनं 10444 धावा केल्या आणि 31 शतकंही झळकावली. टी20 बद्दल बोलायचं झालं तर, गुप्टिलही यातही मागे नाही. त्यानं 349 सामन्यात 9798 धावांसह 6 शतकं झळकावली आहेत. एकूणच, मार्टिन गुप्टिलनं त्याच्या कारकिर्दीत 54 शतकं झळकावली आहेत.
वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 3 द्विशतके झळकावली गेली आहेत. गुप्टिलशिवाय वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांनी ही कामगिरी केली. मात्र विश्वचषकातील एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गुप्टिलच्याच नावावर आहे. 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 223 चेंडूत 237 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या खेळीत त्यानं 11 षटकार आणि 24 चौकार लगावले होते. याच विश्वचषकात ख्रिस गेलनं झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची इनिंग खेळली होती.
हेही वाचा –
रोहित-विराटचा गेलेला फॉर्म कसा परत येईल? रवी शास्त्रींनी सांगितला रामबाण उपाय
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून केएल राहुलचा पत्ता कट होणार? या दिग्गज खेळाडूचं स्थानही धोक्यात
बुमराह नाही, तर हा खेळाडू होणार रोहित शर्मानंतर भारताचा पुढील कर्णधार; माजी खेळाडूचा धक्कादायक दावा!