पहिल्या दोन टी२० सामन्यात बांगलादेशकडून मात खाल्यानंतर न्यूझीलंडने मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. ढाक्याच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५२ धावांनी बांगलादेशला धूळ चारली. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत बांग्लादेश २-१ ने पुढे आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज अजाज पटेलने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगीरी करत १६ धावा देऊन ४ बळी घेतले. त्याला कोल मॅकॉन्ची याने १५ धावा देऊन ३ बळी घेत चांगली साथ दिली. या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमूळे न्यूझीलंडने बांगलादेशवर ५२ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत पुनरागमन केले.
पहिले दोन सामने जिंकल्यानंतर बांगलादेश न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकण्याचा स्वप्न पाहत होता. पण, न्यूझीलंडच्या १२८ धावांचे माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची तारांबळ उडाली आणि अवघ्या ७६ धावसंख्येवर संपूर्ण संघ बाद झाला. बांगलादेशचे आठ फलंदाज दुहेरी अंकही गाठू शकले नाही. बांगलादेशकडून मुश्फिकूर रहीमने २० धावा केल्या, तर मोहम्मद नैमने १३ तर लिटन दासने १५ धावा केल्या.
तत्पूर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात पाच गडी गमवत १२८ धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर राचीन रविंद्र आणि विल याँग यांनी प्रत्येकी २० धावा केल्या. हेन्री निकोलसने ३६ धावांची खेळी केली, तर टॉम ब्लॅंडेल ३० धावा करत न्यूझीलंड संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.
याआधीच्या दोन्ही टी२० सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा पराभव केला होता. याआधीच्या मालिकेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा देखील ४-१पराभव केला होता. या विजयामुळे टी२० क्रमवारीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पछाडत सहावे स्थान पटकावले तर ऑस्ट्रेलिया सातव्या स्थानावर घसरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ओव्हल कसोटीत घडला इतिहास!! पहिल्यांदाच ‘या’ धावसंख्येवर बाद झाले तब्बल ४ फलंदाज
4th Test Live: शार्दुल ठाकूरचा रुटला दणका, धावांवर केले बोल्ड; भारताला विजयासाठी ३ विकेट्सची गरज






