---Advertisement---

२०१९ विश्वचषकात दाखवलेल्या खिलाडूवृत्तीसाठी न्यूझीलंडला मिळाला हा मोठा पुरस्कार

On: बुधवार, डिसेंबर 4, 2019 8:38 PM
---Advertisement---

न्यूझीलंडच्या संघाला 2019 चा क्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखवलेल्या खिलाडूवृत्ती, नम्रता आणि निःस्वार्थपणाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

2019 विश्वचषकाचा नाट्यपूर्ण अंतिम सामना निर्धारित 50-50 षटकानंतर बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. मात्र त्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांच्या आधारावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले होते. त्यावेळी न्यूझीलंडने हा निकाल मान्य करत उपविजेतेपदावर समाधान मानले होते.

याबद्दल या पुरस्काराच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या मेरीलबन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कुमार संगकाराने न्यूझीलंडचे कौतुक केले आहे. संगकारा म्हणाला, “न्यूझीलंड संघ या पुरस्कारासाठी पात्र आहे. त्यांनी अंतिम सामन्यात ज्या प्रकारचे उत्कृष्ट खिलाडूवृत्ती दाखवली ती खरोखर स्पर्धेसाठी योग्य होती.’

‘त्यांच्या संघाने दाखवलेले हे उदाहरण क्रिकेटच्या आठवणीत दीर्घकाळ टिकून राहील. आपण अजूनही खिलाडूवृत्तीविषयी बोलत आहोत. त्यामुळे ते पात्र आहेत.’

 

एमसीसी आणि ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) यांनी मिळून 2013 मध्ये क्रीडा-पुरस्काराची सुरूवात केली होती. हा पुरस्कार एमसीसीचे माजी अध्यक्ष आणि बीबीसी कसोटी सामन्याचे विशेष समालोचक क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला.

हा पुरस्कार न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघातील अनिर्णित राहिलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---