रविवारी (27 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात झालेला दुसरा वनडे सामना पाहुण्यांनी गाजवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना न्यूझीलंडने तब्बल 76 धावांच्या फरकाने जिंकला. पहिल्या वनडेतील पराभवानंतर दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडने हा सामना खिशात घालत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण षटके खेळल्यानंतर 9 गडी गमावून 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 48 षटकांत 183 धावांवरच गुंडाळला गेला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिव्हाईनने सर्वाधिक धावा केल्या. तीने 86 चेंडूत 79 धावा केल्या. ज्यात सात चौकार आणि एक षटकार होता. तिच्याबरोबरच सलामीवीर सुझी बेट्सने 58 धावा आणि जॉर्जिया पिमरने 41 धावांचे योगदान दिले. तसेच मॅडी ग्रीननेही मधल्या फळीत 5 चौकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. या डावात भारताकडून राधा यादव ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तीने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 69 धावा देऊन 4 बळी घेतले. राधाबरोबरच दिप्ती शर्मानेही 2 फलंदाज बाद केले. तसेच सायमा ठाकूर आणि प्रिया मिश्राने प्रत्येकी एका फलंदाजाची विकेट काढली.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची एकही फलंदाज विशेष खेळ दाखवू शकली नाही. भारताकडून गोलंदाज राधा यादवने शेवटी चिवट झुंज दिली. तिने 64 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 48 धावांची झुंजार खेळी केली. परंतु ती व्यर्थ ठरली. या डावात न्यूझीलंडकडून ली तहूहू आणि कर्णधार सोफी डिव्हाईन यांनी प्रत्येकी 3-3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर जेस केर आणि इडन कार्सन यांनीही दोन-दोन फलंदाजांना बाद केले. परिणामी भारतीय संघ 47.1 षटकांतच 183 धावांवर सर्वबाद झाला.
न्यूझीलंडच्या या विजयासह 3 सामन्यांची ही वनडे मालिका रंजक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे सध्या मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता उभय संघातील 29 ऑक्टोबर रोजी होणारा सामना मालिकेचा विजेता ठरवेल.
महत्त्वाच्या बातम्या-
राधा यादवने मागे धावताना हवेत उडी मारत पकडला झेल, जबरदस्त फिल्डिंग पाहून सगळेच थक्क!
‘या’ 5 संघांकडून भारत घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा पराभूत!
“गौतम गंभीर लवकरच…” भारताच्या पराभवानंतर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!