जगातील सर्वकालीन महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन कसोटी क्रिकेट इतिहासात ८०० बळी मिळवणारा एकमेव गोलंदाज आहे.
मुथय्या मुरलीधरनने हा पराक्रम आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या शेवटच्या कसोटी सामन्यात शेवटच्या चेंडूवर केला होता.
२२ जुलै २०१० साली भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात प्रग्यान ओझाला बाद करत मुरलीधरन कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला होता.
त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी ४००, ५००, ६००, ७०० आणि ८०० बळींचा टप्पा गाठणारा मुरलीधरन पहिला गोलंदाज आहे.
मुथय्या मुरलीधरनने भारता विरुद्धच्या या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच पहिल्या कसोटी नंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहिर केले होते.
या सामन्यापूर्वी मुरलीधरनच्या नावावर ७९२ बळी होते. कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम करण्यासाठी मुरलीधरनला ८ बळींची आवश्यकता होती.
मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या शेवटच्या सामन्यातही भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखत ८ बळी मिळवून इतिहास घडवला.
मुथ्थया मुरलीधरनने श्रीलंकेकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये ८०० तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५३४ बळी घेतले आहेत.