क्रिकेटटॉप बातम्या

PAK vs SA; मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची मजबूत कामगिरी, आफ्रिकेला नमवले

जेव्हापासून मोहम्मद रिझवानने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे, तेव्हापासून संघाच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाकिस्तान संघाला टी20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून त्यांनी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

केपटाऊन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकांत 329 धावा केल्या होत्या. तर या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकन संघ 43.1 षटकांत 248 धावांवरच मर्यादित राहिला.

पाकिस्तानी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. तर रिझवानच्या नेतृत्वाखाली घराबाहेर एकदिवसीय मालिका जिंकण्याची ही त्यांची सलग तिसरी मालिका आहे. यापूर्वी पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला मायदेशात एकदिवसीय मालिकेत पराभूत केले होते. तर झिम्बाब्वे दौऱ्यावर दुसरी वनडे मालिका जिंकली होती आणि आता तिसऱ्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात त्यांना यश आले आहे. मोहम्मद रिझवानच्या आधी एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने घराबाहेर सलग तीन वनडे मालिका जिंकल्या नव्हत्या.

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानी संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानने 80 धावा केल्या तर बाबर आझमने 73 धावांची खेळी केली, मात्र मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या कामरान गुलामने आक्रमक खेळ खेळला. 32 चेंडूत 63 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीत कामरानने 4 चौकार आणि 5 षटकारही मारले. गोलंदाजीमध्ये अनुभवी गोलंदाज शाहीन आफ्रिदीने एकूण 4 बळी घेतले. याशिवाय नसीम शाहने 3, अबरारने 2 तर सलमान आगाने 1 विकेट घेतली. आता उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 22 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

हेही वाचा-

IND VS AUS; शेवटच्या दोन कसोटींसाठी संघाची घोषणा, 19 वर्षीय खेळाडूला संधी
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला धक्का, या मुख्य स्पर्धेत खेळणार नाही हार्दिक पांड्या, मोठे कारण समोर
‘रविचंद्रन अश्विनला चांगली वागणूक मिळाली नाही…’, माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान

Related Articles