आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला बुधवारपासून (२ जून) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटीने सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंडने इंग्लंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवत दिवस आपल्या नावे केला. पदार्पण करणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे याचे नाबाद शतक पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
न्यूझीलंडची समाधानकारक सुरुवात
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे तर, इंग्लंडसाठी यष्टीरक्षक जेम्स ब्रेसी व वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने कसोटी पदार्पण केले. इंग्लंडने आश्चर्यकारक निर्णय घेत संघात एकाही प्रमुख फिरकीपटूला स्थान दिले नाही.
न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे व टॉम लॅथम यांनी अर्धशतकी सलामी दिली. रॉबिन्सनने लॅथमला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार केन विलियम्सन १३ व अनुभवी रॉस टेलर १४ धावांचे योगदान देऊ शकले. त्यांना अनुक्रमे जेम्स अँडरसन व ओली रॉबिन्सन यांनी तंबूचा रस्ता दाखवला.
कॉनवेची कमाल
संघातील तीनही अनुभवी खेळाडू माघारी परतल्यानंतरही कॉनवेवर कसलाही दबाव जाणवत नव्हता. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व मार्क वूड या दिग्गज वेगवान गोलंदाजांचा नेटाने सामना करत त्याने अर्धशतकाची वेस ओलांडली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हेन्री निकोल्सने त्याला सुयोग्य साथ दिली. दिवसातील अखेरच्या सत्र सुरू होताच काही वेळात कॉनवेने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच डावात शतक ठोकण्याची कामगिरी करून दाखवली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ३ बाद २४६ धावा धावफलकावर लावल्या होत्या. कॉनवे नाबाद १३६ तर, निकोल्स नाबाद ४६ धावांवर खेळत आहे. दोघांनीही चौथ्या गड्यासाठी १३२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. इंग्लंडसाठी पदार्पण करणारा ओली रॉबिन्सन दोन बळी घेऊन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघाचे होणार दोन कर्णधार? विराटने दिले संकेत
न्यूझीलंडच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणार, वेगवान गोलंदाजाला विश्वास
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या गोष्टीवर रवी शास्त्री नाराज, आयसीसीला सुचवला बदल