बार्सेलोना संघाचा स्टार ब्राझीलियन फुटबॉलपटू नेमार जुनियर हा बार्सेलोना संघ सोडून फ्रेंच लीग म्हणजे लीग १ मधील संघ पॅरिस सेंट जर्मन या संघासाठी करारबद्ध होणार आहे. नेमारने त्याच्या बार्सेलोना संघातील खेळाडू आणि संघाचे कोच यांना या बाबत माहिती दिली आणि तो प्रशिक्षकांच्या परवानगीनंतर सराव करणार नसल्याचे ही त्याने सांगितले.
नेमारला पॅरिसचा संघ विक्रमी १९७ मिलियन पाउंड इतक्या मोठ्या किमतीला करारबद्ध करणार आहे. मागीलवर्षी पॅरिसचा संघ फ्रेंच लीगचे विजेतेपद राखू शकला नव्हता तर त्या अगोदर सलग चार वर्ष हा संघ या स्पर्धेचा विजेता संघ होता. या अगोदर फुटबॉल मधील सर्वात महागडा खेळाडू मँचेस्टर युनाइटेड संघाचा पॉल पोग्बा होता. या खेळाडूला मँचेस्टर संघाने जुवेन्टस संघाकडून १०५ मिलियन पाउंड एवढ्या किमतीला विकत घेतले होते. नेमारला मिळणारी रक्कम ही अनेक दिग्गजांसाठी आश्चर्याची बाब होती. नेमारला मिळालेली १९७ मिलियन पाउंड म्हणजे २२२ मिलियन युरो ही रक्कम एनबीए मधील अनेक महान आणि दिग्गज खेळाडूंच्या किमतीपेक्षाही अनेक पटीने जास्त असल्याचे दिसून येते.
मागील मोसमात यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्य फेरीच्यासामन्यात बार्सेलोना आणि पॅरिस सेंट जर्मन संघ आमनेसामने आले होते. पहिल्या होम सामन्यात पॅरिस सेंट जर्मन संघाने बार्सेलोन संघाला धूळ चारत ४-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या अवे सामन्यात बार्सेलोना संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर पॅरिस संघाचा धुव्वा उडवला होता आणि सामना ६-१ असा जिंकून इतिहास घडविला होता. त्यात नेमारने खूप चांगला खेळ करत शेवटच्या काही मिनिटात हा सामना बार्सेलोना संघाला जिंकून दिला होता.