टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिजनं अमेरिकेवर 9 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह कॅरेबियन संघानं स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. हा सामना वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनसाठी खूप खास राहिला. त्यानं या सामन्यात त्याच्याच देशाचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचा एक मोठा रेकॉर्ड मोडला आहे.
निकोलस पूरन आता एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. हा रेकॉर्ड गेल्या 12 वर्षांपासून गेलच्या नावे होता. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला, एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या 4 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
(4) शेन वॉटसन, ऑस्ट्रेलिया (2012) – ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनची गणना जगातील सर्वात विस्फोटक फलंदाजांमध्ये होते. त्यानं जगभरात आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं खूप नाव कमावलं आहे. वॉटसननं 2012 टी20 विश्वचषकात धमाल उडवून दिली होती. त्यानं या विश्वचषकात एकूण 15 षटकार मारले होते.
(3) मार्लन सॅम्युअल्स, वेस्ट इंडिज (2012) – वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू मार्लन सॅम्युअल्सनं त्याच्या संघाला 2012 चा टी20 विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून भरपूर धावा निघाल्या आहेत. 2012 च्या टी20 विश्वचषकात सॅम्युअल्सनं कहर करत 15 षटकार लगावले होते.
(2) ख्रिस गेल, वेस्ट इंडिज (2012) – वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलला त्याच्या काळात जगातील सर्वात खतरनाक फलंदाज मानलं जायचं. गेलनं जगभरातील विविध टी20 स्पर्धांमध्ये खेळून अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. त्यानं 2012 टी20 विश्वचषकात एकूण 16 षटकार लगावले होते. त्याचा हा रेकॉर्ड तब्बल 12 वर्ष कायम राहिला.
(1) निकोलस पूरन, वेस्ट इंडिज (2024) – अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आपला तिसरा षटकार लगावताच निकोलस पूरननं एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला. पूरननं या विश्वचषकात एकूण 17 षटकार लगावले आहेत. वेस्ट इंडिजचं स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम आहे. त्यामुळे पूरनच्या षटकारांच्या संख्येत आणखी वाढ होईल, यात काही शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात दिसली अमेरिकन पॉवर! कर्णधारानं हाणला 101 मीटर उत्तुंग षटकार; VIDEO व्हायरल
भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? आजच्या सामन्यात हवामानाची स्थिती कशी असेल?
वेस्ट इंडिजचा कमबॅक! अमेरिकेला धूळ चारत बदललं सेमीफायनलचं समीकरण