वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन सध्या तुफान फार्मात आहे. तो जेव्हाही क्रिजवर फलंदाजीसोठी येतो, तेव्हा विरोधी गोलंदाज थरथर कापायला लागतात. पूरनची पहिल्याच चेंडूपासून आक्रमण करण्याची क्षमता त्याला इतर फलंदाजांपासून वेगळं बनवते.
निकोलस पूरननं 2024 मध्ये एवढे षटकार ठोकले, ज्यामुळे दिग्गज ख्रिस गेलचा 9 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला गेला आहे. 2024 वर्ष संपायला अजून 4 महिने बाकी आहेत, मात्र पूरननं यावर्षी 8 महिन्यांतच टी20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
निकोलस पूरन सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये आपला जलवा दाखवत आहे. तो या लीगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून खेळतोय. सेंट किट्स पॅट्रिएट्स आणि नेव्हिस संघाविरुद्ध खेळताना त्यानं 97 धावांची शानदार खेळी केली. आपल्या या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार हाणले.
या 9 षटकारांसह निकोलस पूरनचे यावर्षी टी20 मध्ये 139 षटकार झाले. यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात टी20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्याच ख्रिस गेलच्या नावे होता. त्यानं 2015 मध्ये 135 षटकार लगावले होते. कॅरेबियन प्रीमियर लीगचा हंगाम अद्याप बाकी आहे. शिवाय पूरन यावर्षी आणखी अनेक लीगमध्ये खेळणार आहे. जर तो दुखापतग्रस्त झाला नाही, तर एका कॅलेंडर वर्षात 200 षटकारांचा आकडाही गाठू शकतो.
टी20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार
निकोलस पूरन – 139 (2024)*
ख्रिस गेल – 135 (2015)
ख्रिस गेल – 121 (2012)
ख्रिस गेल – 116 (2011)
ख्रिस गेल – 112 (2016)
ख्रिस गेल – 101 (2017)
आंद्रे रसेल – 101 (2019)
ख्रिस गेल – 100 (2013)
हेही वाचा –
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात जो रुटची ऐतिहासिक कामगिरी
अंडर-19 संघात निवड… पण राहुल द्रविडचा मुलगा समित विश्वचषकात खेळू शकणार नाही, काय आहे कारण?
बॅटिंगनंतर जो रुटची फिल्डिंगमध्येही कमाल! कसोटीतील राहुल द्रविडचा मोठा रेकॉर्ड धोक्यात