कोलंबो। श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा दुसरा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला यजमान श्रीलंकेकडून ५ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भारतासमोर या मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान असेल.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केली होती. त्यामुळे भारताला १७५ धावांचा बचाव करण्यात अपयश आले होते. याचमुळे आज होणाऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.
तसेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्मालाही पहिल्या सामन्यात काही खास करता आलेले नाही. भारतीय संघात पुनरागमन करणारा सुरेश रैनाही श्रीलंकेविरुद्ध धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे मधल्या फळीवर धावा करण्याचा दबाव वाढला होता.
असे असले तरी शिखर धवन आणि मनीष पांडेने चांगला खेळ केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. या सामन्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करून मालिकेतील पहिला विजय नोंदवण्यासाठी उत्सुक असेल.
तसेच बांग्लादेश संघानेही मागील महिन्यातच श्रीलंकेविरुद्ध २-० ने टी २० मालिका जिंकली होती. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आज बांग्लादेश संघ मैदानात उतरेल.
याआधी भारत आणि बांग्लादेशमध्ये ५ टी २० सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. असे असले तरी बांग्लादेशने २०१६ च्या टी २० विश्वचषकात भारताला चांगली लढत दिली होती. हा सामना भारताने एका धावेने जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाला या सामान्याचीही आठवण ठेवून खेळावे लागणार आहे.
कुठे होईल भारत विरुद्ध बांग्लादेश टी २० सामना?
आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेत भारत विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. तिरंगी मालिकेतील हा दुसरा सामना असणार आहे.
किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामना?
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे प्रसारण होईल?
भारत विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना चाहत्यांना डी स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि रिश्ते सिनेप्लेक्स या चॅनेलवरून पाहता येणार आहे. डी स्पोर्ट्स चॅनेलवरून इंग्लिश समालोचन करण्यात येणार आहे. तर रिश्ते सिनेप्लेक्स चॅनेलवरून हिंदी समालोचन होईल.
हा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामन्याचे ऑनलाईन प्रसारण जिओ टीव्ही लाईव्ह अॅपवर होणार आहे. या अॅपवर चाहत्यांना हा सामना ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा भारतीय संघ:
रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहूल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दिपक हूडा, वाॅशीगंटन सुंदर, य़ुझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दल ठाकूर, जयदेव उनाडकत, मोहंमद सीराज, रीषभ पंत (यष्टीरक्षक)