जगभरातील क्रीडासाहित्याची प्रमुख उत्पादक कंपनी नायके यांनी काल ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून लिव्हरपूलचा ब्रझेलीयन स्टार फुटबॉलपटू फिलिप कॉटिन्हो याच्या बार्सेलोना संघाच्या कराराची बातमी दिली. नायकेची वेबसाईट हॅक केली होती की त्याउलट अधिक खपासाठी केला गेलेला जाहिरातीचा प्रकार होता हे समोर आलेले नाही.
नायके कंपनी स्पेनमधील लोकप्रिय क्लब बार्सेलोना संघाला जर्सी पुरवते. बार्सेलोना समर ट्रान्सफर विंडोपासून कॉटिन्होला करारबद्ध करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु त्यात त्यांना समर ट्रान्सफर विंडोमध्ये यश आले नाही. त्यामुळे १ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या ट्रान्सफर विंडोमध्ये बार्सेलोना कॉटिन्होला करारबद्ध करण्यात यश मिळवेल असे बोलले जात आहे. परंतु ट्रान्सफर विंडो सुरु होण्यापूर्वीच ३१ डिसेंबर रोजी नायकेकडून कराराची घोषणा करण्यात आणि कोटिन्होच्या नावाची जर्सीची जाहिरातबाजी देखील करण्यात आली.
“केम्प नाऊ(बार्सेलोनाचे घरचे मैदान) येथे चमकायला फिलिप कॉटिन्हो तयार आहे. ‘मॅजिशियन’या नावासह मिळवा एफसी बार्सेलोना संघाचे २०१७-१८ चे कीट. त्वरा करा, विनामूल्य वैयक्तिकरण फक्त ६ जानेवारी पर्यंत उपलब्ध.”, असा नायकेच्या वेबसाईटवर मजकूर होता. या मजकुरामुळे जेव्हा फुटबॉल विश्वात गोंधळ उडाला तेव्हा काही वेळानंतर हा मजकूर वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला.
समर ट्रान्सफर विंडोमध्ये नेमारने बार्सेलोना संघाला सोडचिठ्ठी दिल्यापासून बार्सेलोना संघाचे मुख्य लक्ष्य फिलिप कॉटिन्हो होता. कॉटिन्हो मिडफिल्डमध्ये जबरदस्त खेळ करतो. जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मिडफिल्डरपैकी एक असणारा कॉटिन्हो लिव्हरपूलचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असून तो १० नंबरची जर्सी परिधान करतो.