---Advertisement---

WIvENG: बोनर-होल्डरने फेरले इंग्लंडच्या विजयाच्या अपेक्षांवर पाणी! कडवी झुंज देत टाळला पराभव

On: रविवार, मार्च 13, 2022 12:45 PM
eng v wi
---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (WIvENG) यांच्यात अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडने शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजसमोर २८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमान संघाला बाद करून सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ७१ षटके गोलंदाजी करायची होती. परंतु, एनक्रुमाह बोनरच्या उत्कृष्ट बचावासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. परिणामी, सामना अनिर्णित राहिला. मालिकेतील दुसरा सामना १६ मार्चपासून बार्बाडोसमध्ये खेळला जाणार आहे.

सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी इंग्लंडने १ बाद २१७ धावांवरून दुसरा डाव सुरू केला. दिवसाच्या सुरुवातीला पाहुण्या संघाकडे १५३ धावांची आघाडी होती. झॅक क्राऊलीने शतक पूर्ण केले होते. तर, पाचव्या दिवशी कर्णधार जो रूटनेही आपले २४ वे कसोटी शतक पूर्ण करून आपला संघ या सामन्यात पराभव पत्करणार नाही, अशा स्थितीत नेऊन ठेवला. इंग्लंड संघाने आपला दुसरा डाव ३४९ धावांवर घोषित केला. क्राऊलीने १२१ आणि रूटने १०९ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २०१ धावांची भागीदारी झाली.

इंग्लंडने यजमान संघासमोर विजयासाठी २८६ धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार क्रेग ब्रेथवेट (३३) आणि जॉन कॅम्पबेल (२२) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. २५ षटकांमध्ये त्यांनी या धावा केल्या. कर्णधार ब्रेथवेट बाद होताच यजमानांनी सलग चार विकेट्स गमावल्या. वेस्ट इंडिजची अवस्था अचानक ५९/० वरून ६७/४ अशी दयनीय झाली तेव्हा, इंग्लंड संघ हा सामना खिशात घालेल, असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला.. मात्र, पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या बोनरसह माजी कर्णधार जेसन होल्डर इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भिंत बनून उभा राहिला.

बोनरने १३८ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. या वेळी जेसन होल्डरने त्याला चांगली साथ दिली. होल्डरने १०१ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. दोन्ही खेळाडूंनी पाचव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करताना २१४ चेंडूंचा सामना केला. यासह वेस्ट इंडीजने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. दोन्ही डावातील शानदार फलंदाजीसाठी बोनरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---