इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेत १० संघ खेळताना दिसत आहे. आयपीएलच्या या १५ व्या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ नव्याने स्पर्धेत सामील झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील रंगत वाढलेली दिसून आली आहे. मात्र, असे असले तरी, या हंगामात आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असणारे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपले मत मांडले आहे.
आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आत्तापर्यंत एकही सामना जिंकलेले नाही. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून चारही सामने पराभूत झाले आहेत. याबद्दल बोलताना रवी शास्त्री यांनी म्हणले आहे की, आता या दोन्ही संघांची भीती राहिलेली नाही.
प्रसारणकर्त्यांशी बोलताना शास्त्री म्हणाले, ‘दोन्ही संघांसाठी निराजनक गोष्ट कोणती, तर ते सामन्यात पूर्णपणे पराभूत झाले. तूम्ही काही संघांना ओळखता. मी आयपीएलच्या पहिल्या आठवड्यापासून सांगत आहे की, चेन्नई आणि मुंबईमध्ये जो भीतीदायक घटक होता, तो आता राहिला नाही. त्यामुळे कोणताही संघ त्यांना आता घाबरत नाही. त्यांचा तो दरारा राहिला नाही. हे सर्व लिलावात झालेल्या बदलांमुळे झाले.’
तसेच शास्त्री म्हणाले, ‘अन्य संघांना विश्वास मिळाला आहे की, ते या संघांना पराभूत करू शकतात. ते आता चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या नावाकडे पाहात नाही. ते मैदानात जाऊन आपला खेळ खेळतात. ते विश्वास ठेवतात की, ते या संघांना पराभूत करू शकतात. या संघांचा (चेन्नई आणि मुंबई) जो दरारा होता, जो अन्य संघांना घाबरवायचा, तो आता सरला असून ती वर्षे निघून गेली आहेत. त्यावेळी अन्य संघांना संधी असली, तरी ते घाबरायचे की, त्यांनी किमान सामन्यात टिकून राहायचे आहे. पण आयपीएलच्या या हंगामात ही गोष्ट तुम्हाला दिसणार नाही.’
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सध्या आयपीएल २०२२ मधील दोनच असे संघ आहेत, ज्यांना अद्याप विजय मिळालेला नाही. हे संघ सध्या गुणतालिकेत तळाला आहेत. मुंबई इंडियन्स ९ व्या आणि चेन्नई सुपर किंग्स १० व्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे २०१७ पासून या दोन संघांशिवाय कोणत्याच संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलची ४ विजेतीपदे आणि मुंबई इंडियन्सने आयपीएलची ५ विजेतीपदे जिंकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…बडा पछताओगे’, कुलदीपने केकेआरला दिवसा चाँदणे दाखवत पूर्ण केला सूड, आल्या प्रतिक्रिया