लंडन। रविवारी(14 जूलै) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या नाट्यपूर्ण अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडचे 44 वर्षांनंतर विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण झाले.
शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्याबद्दल मगंळवारी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन म्हणाला, या सामन्यात कोणीही पराभूत झाले नाही.
न्यूजटॉक झेडबीशी बोलताना विलियम्सन म्हणाला, ‘शेवटी कोणीही आम्हाला वेगळे करु शकले नाही, कोणीही अंतिम सामना जिंकला नाही, पण विजेता एकच असणार होता.’
तसेच न्यूझीलंड संघाने या सामन्यात ज्या प्रकारे त्यांचा पराभव स्विकारला त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. याबद्दल विलियम्सन म्हणाला स्पर्धेच्या नियमांबद्दल आधीपासूनच सर्वांना माहिती होती.
2019 विश्वचषकाचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हर घेण्यात आली होती. पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली. त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा या सामन्यात जास्त बाऊंड्री मारल्या असल्याने इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते.
या सामन्यानंतर जेव्हा विलियम्सनला आयसीसीच्या नियमाबद्दल विचारले होते, तेव्हा विलियम्समन पहिल्यांदा म्हणाला, ‘मला वाटते तूम्ही कधीही असा प्रश्न विचाराल असा विचार केला नसावा आणि मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, असा मी कधी विचार केला नव्हता.’
‘या सर्व गोष्टींचा स्विकार करणे अवघड आहे. दोन्ही संघांनी या क्षणासाठी खूप मेहनत घेतली आहे.’
‘दोन प्रयत्नांनंतरही विजेता निर्धारित करता आला नाही. यानंतर जे काही झाले, तसे होण्याची कोणत्याही संघाची इच्छा नसेल.’ तसेच विलियम्सनने हा शानदार सामना असल्याचेही म्हटले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडलाही 50 षटकात सर्वबाद 241 धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. यावेळी न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने गोलंदाजी केली होती. तर नंतर न्यूझीलंडलाही सुपर ओव्हरमध्ये 15 धावाच करता आल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–स्टोक्स खेळत होता इंग्लंडकडून पण वडील देत होते न्यूझीलंडला पाठिंबा
–ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनीची वेस्टइंडीज विरुद्ध शानदार कामगिरी
–विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड; धोनीच्या भविष्याबाबत सस्पेन्स कायम